
सावंतवाडी : शहरात मोहरम निमित्त ताजिया बसविण्यात आले आहेत. एकूण 7 ठिकाणी हा उत्सव होतो. सालाबादप्रमाणे यावर्षीही मोठ्या उत्साहात पीर उत्सवाला प्रारंभ झाला आहे. हिंदू-मुस्लिम एकतेचे दर्शन या निमित्तानं घडते. सालईवाडा येथे संस्थानकालीन मराठा सरदार घराण्याच्या नावानं असलेला 'निंबाळकर पीर' एकात्मतेच प्रतिक मानलं जातं. मुस्लिम बांधवांकडून भक्तीमय वातावरणात हा सोहळा संपन्न होत आहे.
शहरात सरदार निंबाळकर पीर, जलाल शहा पीर, तहसीलदार पीर, सय्यद पीर, म्हाताचे पीर, पटवीचे पीर, काझीचे पीर बसविण्यात आले आहेत. हिंदू बांधवांना या ठिकाणी विशेष मान असतो. सावंतवाडी संस्थांच्या राजघराण्याला येथे नैवेद्याचा मान आहे. हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असणारा हा उत्सव सावंतवाडीत साजरा केला जातो. मोहरम महिन्यात हजरत मोहम्मद पैगंबर यांचे नातू हसेन आणि हुसैन हे दोघेही करबला येथे शहीद झाले होते. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ मुस्लिम बांधव ताबूत विसर्जनाच्या दिवशी शोक व्यक्त करतात. हसेन आणि हुसैन यांचे बलिदान उजागर केलं जात.
दरम्यान, हिंदू- मुस्लिम ऐक्याचं प्रतीक अशी सरदार निंबाळकर पिराची ओळख आहे. तब्बल अडीचशे वर्षांपूर्वीची परंपरा असलेला हा पीर आजही सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान आहे. ‘मराठ्यांचा पीर’ अशीही याची ओळख आहे. सालईवाडा भागात असलेला सरदार निंबाळकर पीर गेली अनेक वर्षे मुस्लिम बांधवांसह हिंदू धर्मीयांकडूनही पूजला जातो. येथे गूळ, धूप, अगरबत्तीचा नैवेद्य दाखविला जातो. हा पीर विसर्जनाला जात असताना कळसुलकर हायस्कूल येथील भवानी देवीच्या भेटीला जातो. पूर्वी भवानी मंदिरात पीराच्या पतवा ठेवल्या जात असत. त्यामुळे त्याठिकाणी भवानी देवीला भेटण्याची प्रथा आहे. त्याकाळी पीर म्हणून पूजले जाणारे पंजे हे विहिरीत सापडले होते. मधल्या काळात ते चोरीस गेले होते. तेव्हा तत्कालीन सावंतवाडी संस्थानच्या राजांनी स्वखर्चाने ते पुन्हा तयार करून दिले. त्यामुळे सावंतवाडी संस्थानचे व या पिराचे नाते आहे. एकतेचा हा वारसा आजही सावंतवाडी शहरात जपला जातो आहे.