
कणकवली : नरेंद्र मोदी यांची पंतप्रधानपदाचा ११ वर्षाचा कालखंड हा विकसीत आणि आत्मनिर्भर भारतासाठीच ओळखला जाणार आहे. मोदींमुळे भारताची जगभरात प्रतिमा बदलली असून जागतिक राजकारणामध्ये भारताची दखल घेतल्याशिवाय एकही बाब पूर्ण होत नाही. असंख्य महत्वाचे निर्णय, कधीही सुटू न शकणारे प्रश्न मोदी यांनी गेल्या ११ वर्षांत सोडविले आहेत. ही ११ वर्षे भारतीयांसाठी अभिमानास्पद अशीच आहेत. मोदींच्या नेतृत्वाखाली २०२९ पर्यंत भारत आर्थिक महासत्ता बनेल, असा विश्वास राज्याचे मत्स्य व बंदरविकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला.
कणकवली येथील प्रहार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत श्री. राणे बोलत होते. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष लखमराजे भोसले, कणकवली विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष मनोज रावराणे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगांवकर, कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, अनुसुचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष नामदेव जाधव, भाजप कणकवली तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, प्रियंका साळसकर, डॉ. मिलिंद कुलकर्णी आदी उपस्थित होते.
राणे म्हणाले, २०१४ च्या आधीच्या भारतात लोकसंख्येपेक्षा भ्रष्टाचारांच्याच आकड्यांची चर्चा जास्त व्हायची. भारत देश कॉग्रेस सरकारच्या कालावधीत जणू भ्रष्टाचारामध्ये महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल करत होता. अगदी वरपासून खालीपर्यंत भ्रष्टाचाराने बरबटलेली यंत्रणा भारतीय नागरिकांना अनुभवायला मिळाली. पण, मोदींमुळे भारताची जगामधील प्रतिमा पूर्णपणे बदलली आहे. जागतिक राजकारणामध्ये भारताची दखल घेतल्याशिवाय एकही बाब पूर्ण होत नाही. रशिया - युक्रेन युद्ध असेल किंवा अमेरितील घटना, विशेषत: अनेक देशांचे राष्ट्रपती मोदींना भेटताना नमस्कार करून आदर व्यक्त करतात, हीच आपल्या नविन भारताची ओळख असून त्याचे सगळे श्रेय मोदींच्या नेतृत्वाला जाते. सामान्य नागरिकांच्या आयुष्यात परिवर्तन घडविणारे अनेक महत्वाचे निर्णय मोदी सरकारने ११ वर्षांत घेतले. त्यामळे देशाचे दरडोई उत्पन्न वाढले असून भारत देश आर्थिक सत्तेमध्ये जपानच्याही पुढे, तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. मोदी ज्या वेगाने व दिशेने देशाला घेऊन पुढे जात आहेत, ते पाहता २०२९ पर्यंत भारत आर्थिक महासत्तेमध्ये तिसऱ्या क्रमांकावर असेल.
राणे पुढे म्हणाले, असंख्य महत्वाच्या योजना मोदी यांनी या ११ वर्षांच्या कार्यकाळत राबविल्या. २०१४ च्या आधी भ्रष्टाचाराच्या घटना ऐकायला मिळायच्या. पण, मोदींनी पंतप्रधानपदाची सुत्रे हाती घेतली तेव्हा 'ना खाऊंगा ना खाने दूंगा' हे विधान केले आणि ते सिद्धही केले. त्यामुळे भ्रष्टाचार करणारे, सामान्य जनतेचा हक्क पळून घेऊन जाणाऱ्यांना आज चुकीचा विचार करतानाही भिती वाटते. कॉग्रेसच्या काळत सर्रासपणे घोटाळे, उद्योगपती पैसे घेऊन पळताना दिसायचे. पण, मोदींच्या भारतामध्ये अशी हिंमत कुणीही करणार नाही, असे वातावरण देशात निर्माण झाले आहे.
सुरक्षिततेच्या बाबतीत ऑपेशरनसिंदूरसारख्या अनेक मोठ्या मोहिमा देशाला बघायला मिळाल्या. २०१४ पूर्वी ६/११ चा हल्ला किंवा त्यापूर्वी बॉम्बस्फोटासारख्या घटना घडायच्या, त्यावेळी सामान्य नागरिकांनाही त्याची सवय लागली होती. नागरिकही घटना विसरून पुढील आयुष्य जगायचे. पण, आता ऑपरेशन सिंदुरनंतर पाकिस्तान किंवा अतिरेकी कारवाया करणाऱ्या संघटनांनी वाकड्या नजरेने पाहीले तर जशासतसे उत्तर किंबहूना सगळ्यांची झोप हराम करण्याची क्षमता भारतामध्ये आहे, अशी प्रतिमा मोदींच्या नेतृत्वाखाली तयार झाली. पहेलगाम येथे दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर तात्काळ आपल्या सैन्याने अतिरेक्यांच्या अड्ड्यांना उध्वस्त केले. पाकिस्तान आम्ही आतंकवाद्यांना संरक्षण देत नाही, असे सांगत होता. पण, ऑपरेशन सिंदुरच्या माध्यमातून पाकिस्तानचा खरा चेहरा उघड करण्याची हिंमत फक्त मोदींच्याच सरकारने केली. पहेलगाम घटनेनंतर आपल्या माताभगिनी भावना व्यक्त करत होत्या की, मोदी आम्हाला न्याय देतील. मोदींनी देशाचे कुटुंबाप्रमुख म्हणून भावना ओळखून चोख उत्तर देण्याचे, पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणण्याचे काम केले. त्यामुळे आजूबाजूच्या चीन, पाकिस्तान, बांगलादेश या सर्व देशांना संदेश गेला आहे की हा मोदींचा भारत आहे व इथे वाकड्या नजरेने बघाल तर गंभीर परिणाम भोगायला लागतील, अशी प्रतिमा आज भारताची तयार झाली आहे. काँग्रेसचे सरकार असताना नक्षलवाद ही वर्षानुवर्षाची समस्या आपण ऐकत होतो. पण, मोदी सरकारच्या माध्यमातून देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली सरकार नक्षलमुक्त भारताच्या दिशेने वाटचाल करत आहे, असेही राणे म्हणाले.
कधी न सुटणारे, वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले प्रश्न मोदींच्या इच्छशक्ती, कणखर नेतृत्वामुळे सुटले आहेत. ३७० कायदा, राममंदीर, गरिबांसाठीच्या योजना असो, शेवटच्या व्यक्तीपर्यंत विकास पोहोचविण्याची प्रक्रिया मोदी सरकारने यशस्वीरित्या पार पाडली आहे. यापूर्वीचे केंद्र सरकार मोठी योजना जाहीर करायचे तेव्ह योजनेचे पैसे कधी येणार, कुठल्या पक्षाने, मंत्र्याने पैसे खाल्ले हेच आपण ऐकत बसायचो. पण, मोदींच्या कारकिर्दीत योजनेचे पैसे थेट खात्यामध्ये येण्याचे अनुभव शेतकरी, कामगार, महिला व लाभार्थ्यांना मिळाले. ही बाब नागरिकांना २०१४ च्या पूर्वी कधीही अनुभवायला मिळाली नव्हती. शेतकरी, महिलांसाठी असंख्य महत्वाच्या योजना मोदी सरकारने राबविल्या. देशातील शेतकरी सक्षम, आर्थिक समृद्ध झाला पाहीजे, यासाठी महत्वाच्या योजना मोदी सरकारच्या माध्यातून सुरु असून त्या यशस्वीपणे पार पडत आहेत. कोरोनामध्ये केंद्र सरकारच्या शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून ६ हजार रुपये देऊन शेतकऱ्यांना आधार दिला गेला. गोरगरीब लोकांना मोफत अन्नधान्य देण्याचा क्रांतीकारी निर्णय मोदींच्या माध्यमातून झाला, असेही राणे म्हणाले.
देश फक्त चर्चा करत रहायचा असे अनेक प्रश्न मोदींच्या नेतृत्वाखाली सुटताना दिसत आहेत. आज विविध क्षेत्रामध्ये विकास होताना दिसतोय. रोजगारात, नवीन उद्योगधंदे भारतात येताहेत. आधुनिकतेच्या बाबतीत भारत अन्य देशांच्या तुलनेत अग्रेसर आहे. अनेक कंपन्या आपले कारखाने काढताना अमेरिकेच्याही आधी भारताचा विचार करतात. हीच मोदींनी कमवलेली विश्वासार्हता आहे. ११ वर्षामध्ये प्रत्येक घटकाचे मन जिंकण्याचे, प्रत्येक वर्गाला न्याय देऊन सर्वांना सोबत घेऊन जाण्याचे काम मोदींनी केले, असेही राणे म्हणाले.
मोदी सरकारचे कोकण विकासातही योगदान
कोकणच्या बाबतीत मोदी सरकारने दिलेल्या योगदानाबाबत राणे म्हणाले, प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेसह अनेक योजनांचा कोकणाला मोठा लाभ झाला. त्यामुळे बंदरांचा, किनारपट्टीचाही विकास झाला. किनारपट्टीच्या विकासासाठी आर्थिक बजेटमध्ये २५ जार कोटींची तरतूद मोदी सरकारने केली. सारगमालासारख्या अनेक महत्वाच्या योजनांमुळे किनारपट्टी मोठ्या प्रमाणात विकसीत होताना दिसत आहे, असेही राणे म्हणाले.
नाना पटोले, राहुल गांधींवर टीका
नाना पटोले यांनी ऑपरेशन सिंदूरबाबात केलेल्या टीकेला उत्तर देताना राणे म्हणाले, ज्याचा नेताच पप्पू असेल त्याला सगळे लहान मुलेच दिसणार. राहुल गांधी यांची बौद्धीक पात्रता वाढलेली नाही. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे नाना पटोले हे त्यांच्याच पक्षाचे नेते असल्यामुळे त्यांना पूर्ण जगच लहान दिसत असेल. याबाबत पटोले यांची चुक नसून त्यांचे नेते राहुल गांधी जबाबदार आहेत.
शरद पवारांवर टीका
शरद पवार काही म्हणोत किंवा न म्हणोत, त्यांचे सर्वच पक्षात मित्र आहेत. त्यांनी कधी आणि कुणासोबत युती करावी हा त्यांचा प्रश्न आहे. अजित पवार यांनी आमच्यासोबत येण्याचा योग्य निर्णय घेतलाच आहे. एक पवार आमच्यासोबत असल्यामुळे आम्हाला मोठ्या पवारांची चिंता नाही, असेही राणे म्हणाले.
यावेळी मोदी सरकारने ११ वर्षांत केलेल्या कार्याच्या सारांश पत्रकाचेही राणे यांच्या उपस्थितीत प्रकाशन करण्यात आले. तर त्याच अनुषंगाने प्रहार भवन येथे प्रदर्शनही आयोजित करण्यात आले होते.