
बांदा : डेगवे बाजारवाडी येथे असलेला बीएसएनएलचा मोबाईल मानोरा गेले पंधरा दिवस बंद असल्याने येथील मोबाईल सेवा विस्कळीत झाली आहे. याबाबत वेळोवेळी तक्रार करूनही कंपनीकडून कोणतीही दखल घेण्यात न आल्याने डेगवे पंचक्रोशीतील सर्व सरपंच व ग्रामस्थ यांना घेऊन तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भाजपचे डेगवे विभागीय अध्यक्ष तथा माजी सरपंच प्रवीण देसाई यांनी दिला आहे.
श्री देसाई म्हणाले कि, डेगवे गावातील मोबाईल मानोरा बंद अवस्थेत आहे. यामुळे पंचक्रोशीतील मोबाईल सेवा विस्कळीत झाली आहे. मोबाईल कंपनीच्या कार्यालयात याबाबत वेळोवेळी तक्रार देण्यात आली. मात्र ग्रामस्थांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करण्यात आले. यासंदर्भात पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नितेश राणे यांचे लक्ष वेधण्यात येणार आहे. तसेच येत्या दोन दिवसात तक्रारीची दखल न घेतल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन छेडण्यात येणार आहे. यासंदर्भात पंचक्रोशीतील सरपंच व ग्रामस्थ यांची एकत्रित बैठक घेऊन आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येणार असल्याचे श्री देसाई यांनी सांगितले.