मनसे टोल नाका बंद पाडेल : ॲड. अनिल केसरकर

Edited by: विनायक गांवस
Published on: April 23, 2026 16:48 PM
views 24  views

सावंतवाडी : ओसरगाव टोलनाका सुरू करण्याचा प्रयत्न केल्यास मनसे टोल नाका बंद पाडेल असा इशारा जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर यांनी दिला. गेली एकोणीस वर्षे महामार्गाचे काम प्रलंबित असताना व आवश्यक सोई सुविधा उपलब्ध नसताना ही टोल धाड कशासाठी  या मार्गावरून रोज ये-जा करणाऱ्या जिल्हावासियांना टोलचा भुर्दंड कशासाठी असा सवाल त्यांनी केला. 

 

मुंबई गोवा महामार्गाचे काम गेली १९ वर्ष प्रलंबित आहे. अनेक ठिकाणी रस्ता खचलेला आहे तर काही ठिकाणी अत्यंत संथ गतीने काम सुरू आहे. या महामार्गाच्या चुकीच्या पद्धतीने होत असलेल्या कामामुळे यापूर्वी अपघात होवून अनेकांचे संसार उध्वस्त झालेले आहेत.महामार्गाला लागून जो सर्व्हिस रस्ता आवश्यक असतो त्याचा कुठेच पत्ता नाही त्यामुळे आजुबाजूच्या गावांमधील लोक देखील आपली वाहने घेवून मुख्य महामार्गावरूनच जीव मुठीत घेवून प्रवास करत आहेत. त्यामुळे रोज अपघातांचे प्रमाण देखील वाढत आहे. जो पर्यंत या महामार्गासाठी पर्यायी सर्व्हिस रस्ता उपलब्ध करून देण्यात येत नाही तो पर्यंत तसेच या महामार्गावरून रोज प्रवास करणाऱ्या स्थानिक वाहनधारकाबाबत जो पर्यंत ठोस निर्णय घेतला जात नाही तोपर्यंत व प्रलंबित असलेली व अत्यंत धिम्या गतीने सुरू असलेली महामार्गाची कामे जो पर्यंत पूर्ण होत नाहीत तो पर्यंत या महामार्गावर ओसरगाव येथे जबरदस्तीने टोल नाका चालू करण्याचा प्रशासनामार्फत प्रयत्न केल्यास मनसे हा प्रयत्न हाणून पाडेल व वेळ पडल्यास हा टोल नाका बंद करेल असा इशारा जिल्हाध्यक्ष ॲड अनिल केसरकर यांनी दिला आहे.