
सावंतवाडी : शहरातील लक्ष्मीनगर येथील रस्त्याच्या उतरणीवर मधोमध पडलेल्या मोठ्या खड्ड्यामुळे वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या खड्ड्यामुळे अपघातांचे सत्र सुरू झाले असून, रात्रीच्या अंधारात अंदाज न आल्याने अनेक दुचाकीस्वार येथे कोसळून जखमी होत आहेत. या गंभीर समस्येकडे संबंधित प्रभागाच्या नगरसेवकांनी तातडीने लक्ष देऊन हा खड्डा बुजवावा, अशी मागणी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव यांनी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, साधारण एका वर्षापूर्वी याच ठिकाणी अशाच प्रकारे मोठा खड्डा पडला होता. त्यावेळी स्थानिक नागरिकांनी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानकडे मदतीची विनंती केली होती. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून प्रतिष्ठानच्या पुढाकाराने आणि नगरपरिषदेचे मनोज राऊळ यांच्या सहकार्याने तो खड्डा सिमेंट काँक्रिटने बुजवण्यात आला होता. मात्र, सततची रहदारी आणि पावसाच्या प्रभावामुळे आता पुन्हा त्याच ठिकाणी रस्ता खचून मोठा खड्डा तयार झाला आहे. सध्या पालिकेच्या निवडणुका पार पडल्या असून लोकप्रतिनिधी म्हणून नगरसेवक कार्यरत आहेत. असे असूनही या समस्येकडे कोणाचेही लक्ष नसल्याने स्थानिक ग्रामस्थांनी पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानकडे धाव घेतली आहे. या संदर्भात बोलताना रवी जाधव म्हणाले की, उतरणीवर आणि रस्त्याच्या मधोमध खड्डा असल्याने वाहनचालकांना तो वेळीच दिसत नाही, ज्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. आता प्रभागात नगरसेवक निवडून आलेले आहेत, त्यामुळे त्यांनी स्वतः या ठिकाणी भेट देऊन या समस्येचे गांभीर्य ओळखावे. भविष्यातील मोठा अपघात टाळण्यासाठी नगरपालिकेने हा खड्डा तातडीने दुरुस्त करावा. प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी या मागणीची दखल घेऊन तत्काळ कार्यवाही करावी, अशी आग्रही मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.










