
वैभव नाईकांवर साधला निशाणा
कुडाळ : आमदार प्रवीण दरेकर यांनी आज कुडाळ न्यायालयात हजेरी लावली. 'संविधान बचाव' आंदोलनाशी संबंधित एका जुन्या प्रकरणात न्यायालयाने सर्व आंदोलनकर्त्यांना उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. या पार्श्वभूमीवर दरेकर आज न्यायालयात उपस्थित राहिले. हे प्रकरण आता अंतिम निकालाच्या टप्प्यावर असल्याची माहिती त्यांनी दिली.
न्यायालयातील कामकाजानंतर पत्रकारांशी संवाद साधताना आमदार दरेकर यांनी कोकणातील पायाभूत सुविधा आणि गृहनिर्माणावर भाष्य केले. ते म्हणाले, "कोकणामध्ये म्हाडाची घरे उभारण्यासाठी मोठी संधी उपलब्ध आहे. विशेषतः पर्यटन केंद्रांच्या ठिकाणी म्हाडाच्या माध्यमातून सर्वसामान्यांसाठी घरे कशी उभारता येतील, याबाबत शासन सकारात्मक आहे. लवकरच याठिकाणच्या जागांची पाहणी करून योग्य तो निर्णय घेतला जाईल.
२०२९ च्या बारामती निवडणुकीत 'पवार विरुद्ध पवार' संघर्ष नको, असे विधान रोहित पवार यांनी केले होते. यावर दरेकर यांनी आपली भूमिका मांडताना म्हटले की, "रोहित पवारांचे म्हणणे हे त्यांचे वैयक्तिक मत असू शकते, ते लोकमताचा प्रश्न नाही. हा पवार कुटुंबातील अंतर्गत विषय आहे, त्यामुळे त्यांना जे करायचे आहे ते त्यांनी लोकांवर लादू नये."
राज्यातील टोलमाफीच्या धोरणाबाबत बोलताना दरेकर म्हणाले की, "टप्प्याटप्प्याने राज्यात टोलमाफीचे निर्णय होत आहेत. मुंबईतील टोलमाफीचा निर्णय झालाच आहे. आर्थिक स्थितीचा विचार करता टोलबाबत जनतेच्या मागण्यांचा विचार करून सरकार निश्चितपणे भूमिका घेईल." ओसरगाव टोलनाक्याच्या निविदेबाबतही शासन योग्य निर्णय घेईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
टोलप्रश्नावरून टीका करणारे ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांच्यावरही दरेकरांनी निशाणा साधला. "वैभव नाईक यांनी टीका केली नाही, तर त्यांचे अस्तित्व आहे की नाही, असा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे त्यांना अधूनमधून असे फुतकार सोडावे लागतात," अशा शब्दांत दरेकरांनी नाईकांना फटकारले.










