सुनेश गवस यांच्यावर उपचारासाठी मदतीचं आवाहन

Edited by: विनायक गांवस
Published on: April 23, 2026 16:47 PM
views 109  views

सावंतवाडी : दोन्ही किडन्या निकामी झाल्यामुळे गेले वर्षभर दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या झोळंबे येथील सुनेश उदय गवस (३३) या तरुणावर २८ एप्रिल रोजी मुंबईत किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. आपल्या एकुलत्या एका मुलासाठी त्याची आई किडनी दान करणार असुन मुख्यमंत्री सहायता निधीतून ही शस्त्रक्रिया होणार आहे. मात्र या शस्त्रक्रियेनंतर इतर औषध उपचारासाठी पाच लाखाची गरज असुन आर्थिक परिस्थिती गरिबीची असलेल्या गवस कुटुंबियांनी गेले वर्षभर यापूर्वीच्या उपचारासाठी आपल्याकडील होते नव्हते ते सर्व संपवले. त्यामुळे पुढील उपचारासाठी गवस कुटुंबीयांनी जिल्हावासीयांसह सेवाभावी संस्था व दानशूर व्यक्तींना मदतीसाठी आवाहन केले आहे.

       

आर्थिक परिस्थिती गरिबीची असलेल्या गवस कुटुंबात सुनेशसह त्याची पत्नी स्वरा, चार वर्षाची मुलगी वेदा आणि आई उर्मिला आहे. वडिलांचे यापूर्वीच आकस्मित निधन झाले. सुनेश गोवा वेर्णा येथील बर्न अँड इम्पिनॉल प्रा. ली. या टॉवरचे अँटिना बनवण्याच्या कंपनीत कामाला होता. यातून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. जमीन अथवा शेतीसह अन्य उदरनिर्वाहाचे कोणतेही साधन नसल्यामुळे त्यांची घरची आर्थिक परिस्थिती गरिबीची. एक वर्षापूर्वी सुनेशला अशक्तपणा वाटू लागल्याने तो आजाराने ग्रस्त होता. त्यानंतर निदान केले असता त्याच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याचे स्पष्ट झाले. हे समजताच गवस कुटुंबीय अक्षरशः कोलमडून पडले. तेव्हापासून गेले वर्षभर सुनेश डायलिसिसवर आहे. आपल्या पोटचा गोळा वाचण्यासाठी त्याची आई उर्मिला आपली किडनी द्यायला गेले वर्षभर तयार होती. मात्र किडनी प्रत्यारोपणाचा १२ ते १४ लाखाचा खर्च ऐकून गवस कुटुंबियांच्या पायाखालची जमीनच सरकली. घरची परिस्थिती गरिबीची असल्याने एवढी रक्कम आणायची कुठून हा प्रश्न गवस कुटुंबीयांना सतावत होता. पण मुख्यमंत्री सहायता योजनेतून किडनी प्रत्यारोपणाचा प्रश्न याच महिन्यात मार्गी लागला. पण गवस कुटुंबीयांच्या आर्थिक परिस्थितीमुळे या शस्त्रक्रियेनंतर पुढील औषध उपचाराच्या लाखो रुपयांच्या खर्चाचा प्रश्न कायम आहे. 

          

अतिशय दुर्धर असलेल्या या आजाराची सुनेशला माहिती आहे. मात्र स्वतःला सावरत अजूनही तो खचलेला नाही. आपले पूर्वीचे जीवन जगण्याची त्याची इच्छा आहे. आतापर्यंत सुनेशच्या उपचारासाठी गवस कुटुंबियांनी गेल्या वर्षभर आपल्याकडील होते नव्हते ते सर्व संपवले. सध्या या युवकासह त्याची पत्नी, चार वर्षाची मुलगी व आईची स्थिती पाहिल्यावर कुणालाही गहिवरून येईल. त्यामुळे गवस कुटुंबीयांच्या चेहऱ्यावरील हास्य पुन्हा फुलविण्यासह त्याच्या कुटुंबीयांच्या आधारासाठी सर्व समाजमनाच्या दातृत्वाची गरज आहे. ही तातडीची मदत सुनेश याला नवसंजीवनी देऊ शकणार असून त्यामुळे एका कुटुंबाचा आधारही वाचणार आहे. सुनेश याच्यावर माहीम येथील हिंदुजा हॉस्पिटलमध्ये २८ एप्रिल रोजी  किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. मात्र त्यानंतरच्या पहिले सहा महिने औषध उपचारासाठी सुमारे पाच लाख रुपयांची गरज आहे. त्यामुळे सुनेशच्या किडनी प्रत्यारोपणा नंतरच्या या पुढील उपचारासाठी गवस कुटुंबीयांनी जिल्हावासीयांना मदतीसाठी हाक दिली आहे. ज्यांना  सुनेशच्या पुढील उपचारासाठी मदत करावयाची आहे त्यांनी सुनेश उदय गवस, खाते नंबर - १४६५१०५१००००६६३ आय एफ एस सी कोड - बी के आय डी ०००१४१० बैंक ऑफ इंडिया, शाखा - बांदा या खात्यावर जमा करावी. तसेच गुगल पे नंबर 9405152275 यावरही मदत देऊ शकता. आणि अधिक माहितीसाठी ८९९९४५६७४९ या मोबाईलवर संपर्क साधावा असे आवाहन गवस कुटुंबीयांच्यावतीने करण्यात आले आहे.