
सावंतवाडी : बांदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दररोज दशक्रोशीतील २०० ते २५० रुग्णांची वर्दळ असते. मात्र, सध्या या केंद्रात कर्मचाऱ्यांची प्रचंड वानवा असल्याने आरोग्य सेवा कोलमडण्याची भीती निर्माण झाली आहे. या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी मनसे सावंतवाडी तालुकाध्यक्ष मिलिंद सावंत यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांना निवेदन देऊन तातडीने कर्मचारी भरती करण्याची मागणी केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, बांदा आरोग्य केंद्रात चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची (शिपाई) अवस्था अत्यंत बिकट आहे. केंद्रात मंजूर असलेल्या ४ पदांपैकी केवळ २ पदे भरलेली आहेत. यातील शस्त्रक्रिया गृहात 'कटर' म्हणून काम पाहणारे कर्मचारी येत्या ३० एप्रिल २०२६ रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या निवृत्तीनंतर संपूर्ण केंद्राचा डोलारा केवळ एकाच शिपायावर अवलंबून राहणार आहे. यामुळे केंद्राची स्वच्छता, शिस्त आणि दैनंदिन कामकाजावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. केवळ चतुर्थ श्रेणी कर्मचारीच नव्हे, तर महिला आरोग्य सेवक पदही दीर्घकाळापासून रिक्त आहे. बांदा परिसरातून मोठ्या संख्येने महिला रुग्ण उपचारासाठी येतात. मात्र, महिला कर्मचारी नसल्याने त्यांची प्रचंड गैरसोय होत असून त्यांना संकोचाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे बांदा आरोग्य केंद्रात तातडीने किमान २ नवीन शिपायांची नियुक्ती करण्यात यावी, रिक्त असलेले महिला आरोग्य सेवक पद त्वरित भरण्यात यावे. वाढती रुग्णसंख्या पाहता आपत्कालीन स्थितीत रुग्णांना तत्पर सेवा मिळावी यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ पुरवावे अशी मागणी श्री. सावंत यांनी केली आहे. यावेळी जिल्हाप्रमुख ॲड अनिल केसरकर, ॲड. राजू कासकर आदी उपस्थित होते










