विधानसभेसाठी मनसेची मोर्चेबांधणी !

उमेदवारांची चाचपणी सुरू : अमेय खोपकर
Edited by: विनायक गांवस
Published on: August 01, 2024 10:17 AM
views 287  views

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात आगामी निवडणुकीची चाचपणी करण्यासाठी जिल्हा दौऱ्यावर आलो आहोत.‌ काही नेमणूका लवकरच आम्ही करणार आहोत. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा एक अहवाल राज ठाकरेंना देणार असून त्यावर अंतिम निर्णय राज ठाकरे घेतील. उमेदवारांची चाचपणी आम्ही सुरू केली आहे. इथून मनसे निश्चित विधानसभा लढवेल असा विश्वास मनसे नेते अमेय खोपकर यांनी व्यक्त केला.


ते म्हणाले, राज्यातील राजकीय परिस्थिती बघता मनसे अध्यक्ष राज ठाकरे हा एकमेव आशेचा किरण दिसत आहे. त्यामुळे इथली जनता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मागे नक्की उभी राहील असा विश्वास श्री. खोपकर यांनी यावेळी व्यक्त केला. तर गणेशचतुर्थी पुर्वी मुंबई गोवा महामार्गाची परिस्थिती न बदलल्यास मनसेच्या माध्यमातून पुन्हा आंदोलन करू, सरकारला जाग आणू. तसं आंदोलन सुरू देखील झालं आहे. मात्र, सरकार निर्लज्जच असेल तर किती वेळा त्यांना जाग आणायची ? असा सवाल त्यांनी केला.

दरम्यान, चित्रपट श्रृष्टीशी संबंधित असल्यानं मला कोकणात चित्रपट करायला आवडेल, मी स्वतः निर्माता आहे. माझ्या चित्रपटात कोकणातील मुलं आली तर नक्की आवडेल. पण, रात्रीस खेळ चालेच्या सिरीयल दरम्यान इथल्या पक्षीय लोकांनी प्रचंड त्रास दिला. त्यामुळे त्या निर्मात्याला शुटींग बंद कराव लागलं, ही देखील वस्तुस्थिती आहे. माझ्या दृष्टीने लंडन पेक्षा सुंदर माझं कोकण आहे. फक्त, निर्मात्यांना इथे चित्रपटासाठी लागणारी परवानगी, त्यांना त्रास होणार नाही याच ही काळजी घेतली पाहिजे. निर्मात्यांना नक्की आवडेल कोकणात सिनेमा करायला, मी तर अख्खा सिनेमा कोकणात करेन असं मत अमेय खोपकर यांनी व्यक्त केले. यावेळी चित्रपट सेनेचे अध्यक्ष बंटी म्हशीलकर, मनसे जिल्हाध्यक्ष अँड. अनिल केसरकर, जिल्हा उपाध्यक्ष सुधीर राऊळ, मनसे तालुका अध्यक्ष मिलिंद सावंत, वेंगुर्ला तालुका अध्यक्ष सन्नी बावकर, सावंतवाडी तालुका उपाध्यक्ष अतुल केसरकर आंबोली विभाग अध्यक्ष काशीराम गावडे बांदा शहराध्यक्ष चिन्मय नाडकर्णी इन्सुल्ली शाखा अध्यक्ष दिनेश मुळीक, अँड. राजू कासकर, केतन सावंत आदी उपस्थित होते.