
दोडामार्ग : दोडामार्ग शहरात MNGL ने गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी भर बाजारपेठेत खोदकाम केल्याने बाजारपेठ मध्ये रस्त्याची धूळधाण झाली असून नागरिकांना धुळीचा सामना करावा लागत आहे. म खोदकाम करण्यात आलेली माती जशीच्यातशी ठेवल्याने बाजारपेठेत धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे, याबाबत आज शिवसेनेनं आवाज उठवीत नागरिकांना व दुकानदारांना देणाऱ्या ठेकेदार कंपनी व संबंधित अधिकाऱ्याना चांगलेच खडसावले आहे.
रात्रीच्या वेळेत काम उरकून त्यावर रोलिंग केले पाहिजे. तसेच पाणी मारून धुळीचा त्रास होणार नाही याची खबदारी घेतली नसल्यास काम बंद पाडू असाही इशारा खासदार यांच्या उपस्थितीत बाबुराव धुरी व ओंकार कुलकर्णी यांनी दिला.
दोडामार्ग तालुक्यात एमजीएनल कंपनीचे गॅस पाईपलाईन टाकण्याचे काम जोरात सुरू आहे. मागच्या वर्षी सुरुकरण्यात आलेले हे खोदकाम अद्यापही पूर्णत्वास लागलेले नाही. दोडामार्ग बांदा ते दोडामार्ग आई या रस्त्यावरील पाईपलाईनचे काम बहुतांशी संपले आहे. सध्या दोडामार्ग बाजारपेठेत खोदाईचे काम सुरू आहे. बाजार पेठेत करण्यात येणारे खोदकाम शेवटचा टप्पा असल्याने ठेकेदार घाई गडबडीत काम उरकून घेत आहे. मात्र, काम उरकून घेण्याच्या नादात खोदकाम करण्यात येणारी माती जश्यास तशी ठेऊन निष्काळजी पणा दाखवून दिला आहे. दुकानदारांना व नागरिकांना त्यापासून होणारा त्रास याबाबत काडीमात्र विचार न करता मुजोर गिरीने ठेकेदार वागत आहेत. त्याकडे बांधकाम विघाचेही लक्ष नाही.
ग्रामपंचायत निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी दोडामार्ग मध्ये आले खासदार विनायक राऊत आले असता त्यांना घेऊन तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी बाजारपेठेतील एमजीएनल कंपनीच्या केलेल्या खोदकामाची पाहणी केली. दरम्यान बांधकाम अभियंता अनामिका जाधव यांच्याशी मोबाईल द्वारे संपर्क साधून ठेकेदार करीत असलेल्या कामाची पाहणी आपल्या अधिकाऱ्यांनी केली का? बाजारपेठेतील नागरिक धुळीने अक्षरशः हैराण झाले आहेत. धुळीवर पाणी मारण्या इतपत प्रामाणिकता ठेकेदार दाखवत नाही. आणि बांधकाम विभाग त्याकडे दुर्लक्ष करते हे योग्य नाही. उद्या पासून रीतसर काम करून घेतले पाहिजे असे खासदार यांनी खडसावून सांगितले. तर बाबुराव धुरी यांनी हे बंद न झाल्यास आपण गप्प बसणार नाही असा सज्जड दम खासदारांच्या समक्ष ठेकेदारला दिला आहे. यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पडते, अतुल रावराणे, तालुका प्रमुख संजय गवस, माजी नगराध्यक्ष लीना कुबल, श्रेयाली गवस, युवा सेना तालुकाप्रमुख मदन राणे, बाबुराव धुरी, आनंद रेडकर, संदेश वरक, मिलिंद नाईक, संतोष मोर्ये, विजय जाधव, तसेच अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
....अन्यथा गप्प बसणार नाही - एमजीएनल कंपनीच्या संबंधित ठेकेदाराला बोलावून घेतले. लोकांच्या जीवाशी खेळून जी आपण कामे करीत आहात ती बंद करा. कामे करायचीच असतील तर कोणालाही त्याचा त्रास होणार नाही याची पूर्णतः काळजी घ्या. उद्यापासून बाजारपेठेत असे मातीचे ढिगारे दिसल्यास काम बंद पाडू असा निर्वाणीचा इशारा शहरप्रमुख ओंकार कुलकर्णी यांनी ठेकेदाराला दिला.