
दोडामार्ग : विकासकामांच्या उद्देशानं सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ले या तिन्ही तालुक्यात गेली अनेक वर्षे नं झालेल्या आमसभा घेण्यात याव्यात अशी मागणी उबाठा शिवसेनेनेचे जिल्हाप्रमुख बाबुराव धूरी यांनी पत्राद्वारे आमदार दीपक केसरकर यांच्याकडे केली आहे.
त्यांनी केसरकर यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, जिल्हा परिषद पंचायत समितीचा कार्यकाळ संपून आज जवळपास तीन वर्षे पूर्ण झालेली आहेत. परिणामी प्रशासन व जनता यांना जोडणारा लोकनियुक्त प्रतिनिधी नसल्याने जनतेचे अनेक विषयावर चर्चा होताना दिसत नाही. महत्त्वाच्या विषयामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या योजना महाराष्ट्र शासन, आरोग्य विभाग, परिवहन महामंडळ, तिलारी पाटबंधारे प्रकल्प, लघुउद्योग पाटबंधारे, मुख्यमंत्री प्रधानमंत्री ग्रामसडक योजना याबाबतीत योजना प्रभावीपणे राबविल्या जात नाहीत. किंबहुना सुरु असलेली कामे निर्धारीत वेळेत होताना दिसत नाहीत. शेतकऱ्यांना वन्य प्राण्यापासून होणारा त्रास, त्यांची मिळणारी तूटपुंजी नुकसान भरपाई, विकास संस्थांच्या अडचणी, अनुदानित शेती अवजारे, बी बियाणे याबाबत तारतम्यता नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाची मनमानी, ढासळलेली दूरध्वनीची व्यवस्था आदी विषयावर चर्चा होताना दिसत नाही. परिणामी अपवाद वगळता अधिकारी कर्मचारी वर्ग मनाला वाटेल तसं वागत आहे. खातेनिहाय चर्चा आणि विकासकामे आढावा आमसभा झाल्यास चर्चेत येईल. आपल्या स्तरावर जे प्रश्न असतील ते सोडवणूक होण्यासाठी प्रयत्न होतील. ही जनतेची प्रामाणिक अपेक्षा आहे. त्यामुळे आपल्या आदेशाने आपल्या अध्यक्षतेखाली आमसभा आयोजित करावी, अशी विनंती बाबुराव धूरी यांनी आमदार केसरकर यांचेकडे पत्र लिहून केली आहे.