आमदार नितेश राणे यांची कणकवली तहसीलदार कार्यालय, भूमी अभिलेख कार्यालयाला अचानक धडक

यंत्रणा खडबडून जागी
Edited by: उमेश बुचडे
Published on: May 22, 2023 16:46 PM
views 239  views

       तहसीलदार कार्यालयातील पुरवठा विभाग ,भूमी अभिलेख , सेतू कार्यालय आणि  रजिस्टर ऑफिसमध्ये सुरू असलेली दिरंगाई आणि जनतेची होत असलेली हेळसांड याची गंभीर दखल आमदार नितेश राणे यांनी घेतली.प्रत्यक्षात या प्रत्येक कार्यालयात जाऊन  जनतेची गैरसोय का होते याचा जाब अधिकाऱ्याना आणि कर्मचाऱ्यांना विचारला. दोन दिवसात योग्य प्रकरणे निकाली काढा आणि सुरळीत सेवा द्या. कोणाच्याही तक्रारी येता नये याची काळजी घ्या. प्रत्येकाला रेशन मिळाले पाहिजे.प्रत्येकाला दाखला मिळाला पाहिजे.वेळेत खरेदी खत किंवा विक्री चे व्यवहार झाले पाहिजेत. जमिनींचे  सर्वे,भूमी अभिलेखचे नकाशे वेळेत मिळाले पाहिजेत.लोकांना हेलपाटे घालायला लावाल तर ते मला  चालणार नाही. ते मी खपवून घेणार नाही. असा सज्जड दम आमदार नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांना भरला.

        आमदार नितेश राणे यांनी कणकवली तहसीलदार मधील कर्मचाऱ्यांची आज झाडाझडती घेतली.देशात आणि राज्यात गतिमान प्रशासन असताना तालुकास्तरावर सुद्धा कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी मानसिकता बदलणे गरजेचे आहे. जनतेला कोणताही त्रास होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे. कणकवलीत काही दिवस रेशनचे धान्य प्रशासनाचा संगणकमधील डाटा दिसत नसल्यामुळे दिले जात नव्हते. त्याबद्दलचा पुरवठा विभागात जाऊन आमदार नितेश राणे यांनी आढावा घेतला. संबंधित अधिकाऱ्याना त्याची कारणे विचारली.

         लाभार्थ्यांची कोणतीही चूक नसताना जर डाटा मिळत नसेल आणि ती ऑनलाईन प्रक्रिया होत नसेल तर ऑफलाइन पद्धतीने रेशन प्रत्येक व्यक्तीला किंवा रेशन धारकाला दिले गेले पाहिजे आणि ते काम युद्ध पातळीवर सुरू करा. रेशन मिळत नाही अशी तक्रार कोणाची माझ्याकडे येता कामा नये. याची काळजी घ्या. अशा सूचना यावेळी आमदार नितेश राणे यांनी दिल्या.

            दरम्यान सेतू कार्यालयात प्रतिज्ञापत्र करण्यासाठी असलेली गर्दी पाहून त्याची कारणे विचारली. ही गर्दी कमी कशी होईल तासनतास रांगेत न राहता काम कसे होईल हे पहा. एकाच वेळी दोन किंवा तीन टेबलवर काम सुरू करा. अशा सूचना दिल्या. आधार अपडेट करण्यासाठी ही अजून एक व्यक्ती नियुक्त करण्याचे सूचना दिल्या. रजिस्टर ऑफिस मध्ये अनेक लोकांना दिवस दिवस थांबून राहावे लागते. त्यांचे व्यवहार होत नाहीत. खरेदी विक्रीचे व्यवहार अडकले, स्टॅम्प ड्युटी भरून घेतली जात नाही. यासंदर्भात रजिस्टर ऑफिसच्या अधिकाऱ्यांनाही जाब विचारला.  

             इंटरनेट च्या  पर्यायीव्यवस्था निर्माण करण्याच्या सूचना यावेळी आमदार नितेश राणे यांनी त्या अधिकाऱ्यांना दिल्या. भूमीअभिलेख च्या अनेक तक्रारी  आहेत. लोकांना नकाशे मिळत नाहीत. मोजणी जमिनीची होत नाही. यासंदर्भातही योग्य पद्धतीने काम न झाल्यास पुढच्या वेळेला तुमच्या कोणत्याही तक्रारी किंवा गैरसोयी मी ऐकून घेणार नाही. अशा शब्दात अधिकाऱ्यांना सुनावले.यावेळी नायब तहसीलदार राठोड यांनी काही माहिती देण्याचा प्रयत्न केला. त्यांनाही यावेळी आमदार राणे यांनी  योग्य पद्धतीने काम करून घेण्याबाबतच्या सूचना दिल्या.

         यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, भाजपचे जिल्हा सरचिटणीस मनोज रावराणे तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री आदी उपस्थित होते.