आमदार नितेश राणे यांनी आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांची घेतली भेट

ठाकर समाजाच्या विविध मागण्यांविषयी केली चर्चा
Edited by: उमेश बुचडे
Published on: February 21, 2023 16:26 PM
views 162  views

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकर समाज बांधवांवर जात प्रमाणपत्र पडताळणी समिती ठाणे यांच्याकडून वारंवार अन्याय होत होता. विशेष करून ठाणे येथील दि.जी. पावरा, उपायुक्त तथा सहआयुक्त ,जात पडताळणी समिती, ठाणे यांकडून पूर्वग्रह दूषित निर्णय दिले जात होते. त्यामुळे सिंधुदुर्गातील ठाकर समाजातील विद्यार्थी व कर्मचारी यांवर अवैध ठरून उच्च न्यायालयात धाव घेण्याची वेळ येत होती. उच्च न्यायालयाकडून मात्र तात्काळ सकारात्मक निर्णय होत होते. या सर्वात ठाकर समाज बांधवांची प्रचंड आर्थिक हानी होत होती.

 या पार्श्वभूमीवर आमदार नितेश राणे यांनी महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री मान. गावित यांची मंत्रालयात भेट घेतली .भेटीदरम्यान अन्यायकारक उपायुक्त  पावरा यांची तात्काळ बदली करण्याचे आश्वासन श्री गावित यांनी राणे यांना दिले. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकर बांधवांवर कोणताही अन्यायकारक निर्णय लादला जाणार नाही याची हमी दिली.