
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्गसह अन्य ठिकाणी जाणारी गोवा बनावटीची दारू व ड्रग्ज हे सर्व बेकायदेशीर धंदे सिंधुदुर्ग पोलिसांनी मोडून काढावेत व तरुण पिढीला वाचवावे यासाठी पुन्हा एकदा आमदार निलेश राणे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांची सदिच्छा भेट घेत लक्ष वेधले. जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे यांचीही सदिच्छा भेट घेत त्यांच्या वाटचालीस त्यानी शुभेच्छा दिल्या.
आमदार निलेश राणे यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी शिंदे सेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उपनेते संजय आंग्रे, संजय पडते, महिला जिल्हाध्यक्ष सौ दीपलक्ष्मी पडते, सरचिटणीस दादा साईल, आनंद शिरवलकर, श्री करलकर आदी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
जिल्हा प्रशासन प्रमुखांची आजची सदिच्छा भेट होती. जिल्हाधिकारी नव्याने हजर झाले असून पहिल्या भेटीत मी नागरिकांच्या तक्रारी मांडणार नाही किंवा त्याबाबतची निवेदने मी आणली नाहीत. मी आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी आलो आहे. नागरिकांची गतिमान कामे व्हावी ही अपेक्षा आहे यासाठी शुभेच्छा देण्यासाठी मी आलो आहे असे आमदार निलेश राणे म्हणाले. सिंधुदुर्गनगरी नवनगर प्राधिकरण क्षेत्रातील नागरिकांचे अनेक प्रश्न आहेत. या भागातील नागरी सुविधा याकडे त्यांनी लक्ष वेधले.