त्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाका : निलेश राणे

Edited by: कुडाळ प्रतिनिधी
Published on: January 09, 2025 18:05 PM
views 23  views

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील पाणी, आरोग्य, आणि शिक्षणाचे तीन तेरा वाजले आहेत. गेल्या लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष दिले नाही. पण मी याकडे कटाक्षाने लक्ष देईन. यामध्ये सुधारणा होणे गरजेचे आहे. ही सुधारणा करण्यासाठी माझ्यासोबत तुम्हाला खांद्याला खांदा लावून काम करावे लागेल असे आमदार निलेश राणे यांनी कुडाळ पंचायत समिती येथे तालुक्याच्या घेतलेल्या आढावा बैठकीत सांगून यापुढे कोणतीही कारणे ऐकून घेतली जाणार नाही. हा तालुका विकसित करण्यासाठी ठेवलेले ध्येय साध्य करेपर्यंत मी गप्प बसणार नाही. एवढं लक्षात ठेवा अशा सूचना त्यानी आढावा बैठकीमध्ये दिल्या. 

कुडाळ पंचायत समिती येथे पंचायत समिती अंतर्गत असलेल्या विभागांचा आढावा घेण्यासाठी आमदार निलेश राणे यांनी बैठक घेतली. यावेळी गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, सहाय्यक गटविकास अधिकारी चव्हाण तसेच खाते प्रमुख उपस्थित होते. यावेळी बांधकाम विभाग, लघुपाटबंधारे, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, महिला व बालकल्याण, ग्रामपंचायत विभाग यांच्या अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. 

या आढावा बैठकीमध्ये बांधकाम विभागाने दिलेल्या आढाव्यामध्ये अनेक त्रुटी असल्याचे आढळून आले. त्यावेळी आमदार निलेश राणे यांनी सांगितले की, या विभागाबाबत अनेक तक्रारी आहेत. काही ठेकेदारांची बिले काढली जातात. अनेकांची रखडली जातात. हे चालणार नाही ठेकेदारांची बिले काढण्याकडे लक्ष देण्यापेक्षा ठेकेदार करत असलेल्या कामाचा दर्जा कोणत्या पद्धतीचा आहे. याकडे पहा दर्जामध्ये सुधारणा झाली पाहिजे. जे ठेकेदार काम करत नसतील त्यांच्यावर कारवाई करा असे सांगितले. 

काळ्या यादीत टाका : आमदारांची सूचना 

तसेच लघु पाटबंधारे विभाग, पाणीपुरवठा विभाग यांच्या विभागाचा आढावा घेताना तालुक्यात होणाऱ्या पाट बंधार्‍यांची माहिती द्या तसेच जलजीवन योजनेचे तालुक्यात बारा वाजले आहेत. या योजनेतील कामे निकृष्ट दर्जाची झाली आहेत. यामध्ये सुधारणा करा. ज्या ठेकेदारांनी कामे अडवून ठेवली आहेत. आणि ते कामे करत नसतील तर त्यांना काळ्या यादी टाका अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. या संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी चर्चा करून लवकरच या विषयासाठी बैठक घेतली जाईल असे सांगितले. 

गुणात्मक दर्जा वाढला पाहिजे 

आरोग्य विभागाच्या आढावामध्ये सांगितले की, किती कर्मचारी कमी आहेत. याबाबत माहिती द्या. आपल्याला तळागाळातील जनतेला न्याय द्यायचा आहे. औषध पुरवठा तसेच डॉक्टर ज्या ठिकाणी आवश्यक आहेत. त्याची इंतभूत माहिती द्या. येणारे रोग, साथींची माहिती देण्यासाठी आरोग्य विभागाने कार्यक्रम राबवावा या साथीमध्ये कशाप्रकारे काळजी घेतली गेली पाहिजे याची माहिती जनतेपर्यंत गेली पाहिजे ग्रामीण भागातील रुग्णांचे मृत्यू हे आरोग्य विभागाकडे असलेल्या कमी साहित्यांमुळे होत असते आपल्याला आवश्यक असणाऱ्या साहित्याची मागणी करा असे सांगितले. तर शिक्षण विभागाच्या आढाव्यामध्ये सांगितले की, आपण आपल्या विद्यार्थ्यांना कोणत्या प्रकारचे शिक्षण देतो त्यांचा गुणात्मक दर्जा काय आहे याचे कधी ऑडिट झाले आहे का? शिक्षक विद्यार्थ्यांवर किती मेहनत घेतात याचाही आढावा झाला पाहिजे कारण हेच विद्यार्थी आपले भविष्य आहे. त्यांना प्राथमिक शिक्षण चांगले मिळाले पाहिजे ज्या शाळांची दुरुस्ती आहे. त्याबाबत माहिती देऊन किती शिक्षक कमी आहेत याची संख्या सांगा. आपले प्राथमिक शिक्षण चांगले मिळत नसल्यामुळे विद्यार्थी पुढच्या काळात मुलाखतींना जायला सुद्धा घाबरतात त्यामुळे त्यांना प्राथमिक शिक्षण चांगले दिले गेले पाहिजे असे आमदार निलेश राणे यांनी सांगितले. 

या आढावा बैठकीमध्ये आमदार निलेश राणे यांनी सांगितले की, ही पहिली आढावा बैठक असल्यामुळे माहिती घेतली पुढील काळात वर्षाला तीन ते चार आढावा बैठकी होतील आणि या बैठकीमध्ये मागील बैठकीमध्ये झालेली माहिती विचारून यावर किती टक्के काम झाले याचा आढावा घेतला जाईल. त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कामांमध्ये कोणतीही दिरंगाई करू नये मी स्वतः २४ तास काम करतो माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून कुडाळ तालुक्याच्या विकासासाठी काम करण्याची जबाबदारी तुमची पण आहे. तुम्ही निधी मागा त्यासाठी मंत्रालयात भांडण्याचे काम माझे आहे माझ्याजवळ जादूची कांडी नाही. पण तुम्ही आणि आम्ही मिळून काम केलं तर अशक्य असे काही नाही. तुम्हाला ज्या समस्या भेडसावत असतील त्या मला थेट सांगा. त्यावर उपाययोजना केल्या जातील. पण कामांमध्ये हलगर्जीपणा चालणार नाही पहिल्या आढावा बैठकीत सूचना दिले आहेत. पुढील बैठकीमध्ये मला तुमच्या कामाची पोचपावती पाहिजे असे सांगितले.