सरवणकरांचा माज उतरवला, हिशोब चुकता

महेश सावंतांनी सुनावलं
Edited by: विनायक गांवस
Published on: December 07, 2024 19:31 PM
views 231  views

सावंतवाडी : बाळासाहेब ठाकरेंनी ज्या दगडाला शेंदूर फासला त्या ३० वर्ष राजकारणात असलेल्या सदा सरवणकर यांचा माज उतरवायचा होता. तो माज उतरवला, मागचा हिशोब चुकता झाला. गद्दारीचा शाप शिवसैनिकांनी, महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पुसून टाकला असे मत नवनिर्वाचित उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे आमदार महेश सावंत यांनी व्यक्त केले. तसेच कोकणची जबाबदारी उद्धव ठाकरेंनी दिली तर स्वीकारेनच, नाही दिली तरीही इथल्या शिवसैनिकांना ताकद देईन असा विश्वास श्री. सावंत यांनी व्यक्त केला. सावंतवाडी येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

आमदार महेश सावंत म्हणाले, गावात घोडेमुखाच दर्शन घेण्यासाठी आलो होतो. देवावर माझी श्रद्धा असून आजवर कधीही यात्रा चुकवली नाही. उद्या आदित्य ठाकरे यांच्यासह बैठक आहे. त्यानंतर आमदारांच्या शपथविधीविषयी निर्णय होईल अशी माहिती दिली. तर माझ्या मनात इर्षा होती, बाळासाहेब ठाकरेंनी ज्या दगडाला शेंदूर फासला त्या ३० वर्ष राजकारणात असलेल्या सदा सरवणकर यांचा माज उतरवायचा होता. तो माज आज उतरवला. त्यांच्या मुलाविरोधात देखील मी अपक्ष लढत दिली होती. मात्र, काहीशा मतांनी पराभव झाला. आज सगळा हिशोब चुकता झाला. माझ्यावर गणेश चतुर्थीत गोळीबार करण्याचा प्रयत्न देखील सरवणकर यांनी केला होता. माहिमला शिवसेनेचा भगवा फडकणार हे बाळासाहेबांना दिलेलं वचन आज पूर्ण करता आलं. गद्दारीचा शाप शिवसैनिकांनी, महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पुसून टाकला अस विधान करत राज ठाकरेंच आव्हान आमच्यासमोर नव्हत अशी खोचक टीका आमदार श्री. सावंत यांनी केली.

दरम्यान, आगामी महापालिकांसाठी आम्ही तयारी सुरू केली आहे. आमचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आणण्यासाठी बांधणी सुरू केली आहे. महानगरपालिकेत शिवसेना स्वतंत्र होती. महाविकास आघाडी हा वरच्या स्तरावरचा विषय आहे. असंख्य कार्यकर्ते स्थानिक पातळीवर काम करत असतात. त्यांना प्रतिनिधित्व मिळाव अशी इच्छा असते.  त्यामुळे आघाडी झाली नाही तर स्वबळावर लढू, महानगरपालिकेत यश मिळवणं हे महाराष्ट्रात यश मिळवण्यासारख असेल असं मत व्यक्त केले. तसेच सिंधुदुर्गात उद्धव ठाकरे यांनी जबाबदारी दिली तर स्वीकारेन अन्  नाही दिली तरीही येथील शिवसैनिकांना ताकद देईन असा विश्वास आमदार महेश सावंत यांनी व्यक्त केला. यावेळी माजी आमदार राजन तेली, विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ, तालुकाप्रमुख मायकल डिसोझा, उपजिल्हा प्रमुख चंद्रकांत कासार, शब्बीर मणियार, शैलैश गवंडळकर, शिवदत्त घोगळे, मेघश्याम काजरेकर, बाळू माळकर, राजू शेटकर, श्रृतीका दळवी, आशिष सुभेदार, राजा वाडकर, श्री. गवस, निशांत तोरसकर, सोनू दळवी आदी शिवसैनिक उपस्थित होते.