आ. भास्कर जाधवांचा पक्ष सोडणाऱ्यांवर थेट आरोप

Edited by: मनोज पवार
Published on: July 30, 2025 20:56 PM
views 73  views

गुहागर : "विकासाच्या नावाखाली सत्तेच्या हव्यासासाठी पक्ष बदलणाऱ्यांचा खरा चेहरा जनतेसमोर आणण्याची वेळ आली आहे," अशा ठाम शब्दांत आमदार भास्कर जाधव यांनी अलीकडच्या घडामोडींवर प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या मतदारसंघातील काही माजी सहकाऱ्यांनी विरोधी पक्षात प्रवेश केल्यानंतर, जाधव यांनी सोशल मीडियावर आणि स्थानिक जनतेशी संवाद साधताना ही स्पष्ट भूमिका मांडली.

“'भास्कररावांवर आमचा राग नाही, त्यांनीच विकास केला' असं म्हणणारे आज विकासासाठी दुसऱ्या पक्षात जात असल्याचं सांगतात. मग हे खरं की ते खरं?” असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी पक्षत्याग करणाऱ्यांच्या हेतूंवर थेट शंका उपस्थित केली. "कोणत्या विकासासाठी गेलेत? कोणतं ठोस काम सांगू शकतात का? केवळ सत्तेसाठीच हा बदल आहे, याची जनतेने जाणीव ठेवावी," असे आवाहनही त्यांनी केलं.

गुहागरच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न

भास्कर जाधव यांनी आपल्या कार्यकाळातील अनेक विकासकामांचा उल्लेख करत जनतेला आठवण करून दिली की, २००७ पासून गुहागर तालुक्याच्या प्रत्येक गावात – वाड्या, वस्त्या, डोंगराळ भागांमध्ये – रस्ते, वीज, पाणी, पूल, सामाजिक सभागृहांची कामं झाली. खाजगी मालकीच्या विहिरी, पायवाटा, जागा लोकांसाठी खुले करण्यात आल्या. “कोरोना काळात स्वतःच्या कुटुंबावर दुःख असतानाही मी मैदानात होतो. पुणे–मुंबईत वैद्यकीय मदतीसाठी धावलो. चाकरमानी सुखरूप घरी पोहोचावेत म्हणून मी संघर्ष केला,” असेही त्यांनी नमूद केले.

राजकीय निर्णयावरील खंत आणि मनोवेदना

“मी कुणालाही ‘कार्यकर्ता’ म्हणत नाही. सर्वजण माझे सहकारी आहेत. गेलेल्यांना कायम मानाचं ताट वाढलं. भाऊ–बहिणीप्रमाणे वागलो. म्हणूनच त्यांच्या जाण्याचं दुःख आहे. मी आक्रमक आहे, पण त्याहून अधिक संवेदनशील आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावनाही उघडपणे व्यक्त केल्या.

‘विकास’ करणाऱ्यांचा लेखाजोखा मागितला

सध्याच्या परिस्थितीत ‘विकासासाठी गेलो’ असं सांगणारे नेमकं कोणता विकास करणार आहेत? ते याआधी कोणतं काम करून दाखवलं? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. “जनतेला फसवण्याचा खेळ थांबवा. मी अजून चार वर्ष आमदार आहे. लाथ मारीन तिथं पाणी काढण्याची ताकद माझ्यात आहे. शंका असेल तर थेट माझ्याशी बोला,” असे आवाहन करत त्यांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं.

शिवसेनेचा भगवा अधिक डौलात फडकवणार

आपल्या भाषणाच्या शेवटी, जाधव यांनी आपला शिवसेनेवरील विश्वास ठामपणे अधोरेखित केला. “उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा भगवा मी डौलाने फडकवत ठेवणार आहे. तुमचं प्रेम वाढावं हीच अपेक्षा आहे. लवकरच गावात व मुंबईत जाहीर मेळावे घेणार आहे, तेव्हा भेटू आणि अधिक बोलू,” असे सांगत त्यांनी संवादाच्या नव्या पर्वाची घोषणा केली.