आमदार भास्कर जाधव यांना अटकपूर्व जामीन मंजूर

पुण्याच्या डेक्कन पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला होता गुन्हा !
Edited by: प्रतिनिधी
Published on: October 24, 2022 21:12 PM
views 326  views

पुणे : केंद्रीय मंत्री नारायण राणे व कुटुंबियांविरोधात आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या आमदार भास्कर जाधव यांना पुणे सत्र न्यायालयाने अटी व शर्तीवर अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार जाधव यांच्या विरुद्ध डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी योगेश अरुण शिंगटे (वय ३७, रा. निगडी) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. सिंधुदुर्ग येथील कुडाळमध्ये जाधव यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी खासदार निलेश राणे व आमदार नितेश राणे यांच्याविरोधात उपहासात्मक उल्लेख करुन सामाजिक भावना दुखावल्याच्या आरोपावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, प्रकरणात जाधव यांच्यावतीने विजयसिंह ठोंबरे यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जमीन मिळण्यासाठी अर्ज दाखल करीत युक्तीवाद केला होता. त्यानुसार जिल्हा व सत्र न्यायाधीश जी. ए. रामटेके यांनी अटी व शर्तीवर आमदार भास्कर जाधव यांना हंगामी अटकपूर्व अर्ज मंजूर केला आहे