
सिंधुदुर्ग : प्रसाद पाताडे | उमेश बुचडे : गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमासंदर्भात सिंधुदुर्ग जिल्ह्यात संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत, सुप्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमांच कणकवली व कुडाळ तालुक्यात आयोजन करण्यात आला आहे. या कार्यक्रमाची तिकीट विक्रीही सुरू झाली असून पोलिसांकडून परवानगी मिळाली आहे. तर समाज माध्यमांवर गौतमीच्या विरोधात समर्थनार्थ पोस्टरबाजीही सुरू झाली आहे.
गौतमी पाटील हिचा प्रत्येक कार्यक्रम काही ना काही कारणांमुळे वादग्रस्त ठरला असल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणाऱ्या कार्यक्रमाला सामाजिक माध्यमांवर विरोध होताना पाहायला मिळत आहे. सामाजिक संघटनांनी या कार्यक्रमाला परवानगी नाकारावी. याबाबत पोलीस प्रशासना सह जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही दिले आहे. तरीही पोलीस प्रशासनाने परवानगी दिली आहे.
गौतमी पाटील सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होणार आहे कळताच तरुण वर्गामध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे, तर दुसरीकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भजन, कीर्तन, फुगडी या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींकडून गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमाला विरोध केला जात आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने जरी गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाला परवानगी दिली असली तरी कार्यक्रमादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास जबाबदार कोण ? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांकडून विचारला जातोय.
सिंधुदुर्ग जिल्ह्याची सीमा असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातही गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं, मात्र कोल्हापूर जिल्ह्याच्या सांस्कृतिक व मनोरंजन विभागाने परवानगी नाकारल्याने गौतमी पाटीलचे कार्यक्रम रद्द करण्यात आले होते, तर काहीच दिवसापूर्वी नाशिक जिल्ह्यामध्ये नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या लावणीचा कार्यक्रम चक्क जिल्हा परिषद शाळेमध्ये आयोजित करण्यात आल्यामुळे महाराष्ट्रभर शैक्षणिक क्षेत्रात उलट चळवळ चर्चांना ऊत आला होता.
सिंधुदुर्ग जिल्ह्याची परंपरा ही वारकरी परंपरा असल्याने जिल्ह्यात दशवतार भजन कीर्तन फुगड्या या लोककलांना प्राधान्य दिलं जातं मात्र तरीही गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाच्या आयोजनामुळे जिल्ह्यातील जुन्या जाणत्या प्रतिष्ठित नागरिकांकडून या कार्यक्रमाबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली जात आहे.
"सिंधुदुर्ग जिल्ह्याची सांस्कृतिक परंपरा आणि येथील जनतेची अभिरुची फार वेगळी आहे. दशावतार, चित्रकथी, कळसुत्री बाहुल्या, वारकरी भजन या वरवर करमणुकीच्या वाटणा-या, परंतु नीतिमत्तेची शिकवण देणा-या लोककलांनी इथले जनमानस पोसले गेले आहे. त्यामुळे गौतमी पाटील ज्या प्रकारे प्रकट होते, त्या धांगडधिंग्याला जिल्ह्यात थारा असता नये. तमाशा लोककला ही उच्च दर्जाची आहे. तिला आमचा विरोध नाही. पण नृत्यकलेच्या नावाआड जो बिभत्सपणा आणि उत्शृंखलपणा चालतो, तो येथील परंपरेच्या पूर्ण विसंगत आहे. या कार्यक्रमस्थळाची प्रेक्षक क्षमता दोन्ही ठिकाणी आठशे आहे, असे कळते. मात्र या कार्यक्रमाचा पूर्वेतिहास पाहता हजारोंची गर्दी होणार हे उघड आहे. यामुळे वाहतूक कोंडी, कायदा सुव्यवस्था हे प्रश्न उद्भवण्याची दाट शक्यता आहे. यापुर्वी काही जिल्ह्यात प्रशासनाने या बाबी गृहीत धरुन या कार्यक्रमाला परवानगी नाकारली आहे. या सर्व बाबी लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने या कार्यक्रमाला परवानगी देऊ नये, अशी माझी विनंती आहे", असे मत 'घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग' या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सतीश लळीत यांनी व्यक्त केले आहे.