बेपत्ता विवाहितेचा मृतदेह सापडला झाडीत

नातेवाईकांनी व्यक्त केला घातपाताचा संशय
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: February 24, 2026 15:45 PM
views 692  views

मालवण : मालवण तालुक्यातील कालावल येथे मंगळवारी कालावल पुलाखाली खाडी पात्रात वायंगणी- दुखंडेवाडी येथील बेपत्ता विवाहित महिला अंतरा हर्षद दुखंडे, वय 28 हिचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. संबंधित महिला गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता होती. तशी नोंद आचरा पोलिस ठाण्यात सोमवारी रात्री उशिरा दाखल करण्यात आली होती. आज स्थानिक ग्रामस्थांना पुलाखालील झाडीत मृतदेह आढळून आला. ग्रामस्थांनी याबाबतची माहिती तात्काळ पोलिसांना दिली. 

मृतदेह बेपत्ता अंतरा दुखंडे हिचा असल्याचे पाहून तिचे पती व नातेवाईकांनी टाहो फोडला. मृतदेह हा कालावलं पुलाखालील पाणी नसलेल्या ओलसर भागात  झाडीमध्ये अडकून असल्याचे दिसत होते. अंतरा हिचा घातपात करून तीला खाली फेकून दिले असल्याचा संशय तिचे नातेवाईकांनी यावेळी व्यक्त केला. 

दरम्यान घटनेची माहिती मिळताच मालवण पोलिस सहाय्यक उपनिरीक्षक सचिन माने व सुशांत पवार, हडी सरपंच प्रकाश तोडवळकर, पोलीस पाटील जानवी पांजरी, अशीता राणे या दाखल झाले होत्या. घटनास्थळी ग्रामस्थांनी गर्दी केली होती.

प्राथमिक पाहणीत मृत्यूचे कारण स्पष्ट झाले नसून मृत्यू नेमका कशामुळे झाला याचा तपास सुरू आहे. पोलिसांकडून सर्व बाजूंनी चौकशी करण्यात येत आहे. ही घटना आत्महत्या, अपघात की घातपात याबाबत स्पष्टता येण्यासाठी शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा केली जात आहे. 

आचरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वायंगणी दुखंडेवाडी येथील अंतरा हर्षद दुखंडे, वय 28 ही महिला बेपत्ता झाल्याची फिर्याद तिचे पती हर्षद दुखंडे यांनी आचरा पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री दिली होती. त्यांनी दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, माझी पत्नी ही आचरा येथील खासगी शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होती.  शनिवारी  नेहमीची कामे आटपून  आम्ही रात्री झोपलो असताना रविवारी पहाटेच्या दरम्यान घराच्या मागील दरवाज्याच्या कडीचा आवाज आल्याने जागा झालो. त्यावेळी माझ्या बाजूला असलेली पत्नी जागेवर नव्हती, म्हणून मी मागच्या दरवाज्याकडे गेलो असता दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी दरवाजाला बाहेरुन कडी लावल्याने दरवाजा उघडत नव्हता. त्यामुळे खिडकितू पाहिले असता मला माझी पत्नी अंतरा ही रात्री घातलेल्या गाऊनवर हातात बॅग घेवुन जाताना दिसली. म्हणून मी घरातील बॅटरी घेऊन आमच्या घराच्या समोरील दरवाजाने बाहेर जाऊन पाहिले असता माझी पत्नी मला दिसून आली नाही. परंतु त्याच दिशेने गाडीचा आवाज आला होता. त्यानंतर मी माझी गाडी घेऊन तिचा हडी, चिंदर पेट्रोलपंप याठिकाणी शोध घेतला. मात्र, ती सापडून आली नाही. म्हणून मी माझी मुंबई येथे राहणाऱ्या सासूला फोन करुन घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर मी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास माझ्या पत्नीच्या मैत्रिणी व आमच्या नातेवाईकांकडे, खाडी किनारी शोध घेतला, परंतु ती काही मिळून आली नाही. 23 रोजी माझी पत्नी अंतरा हिचा एम.कॉमचा  देवगड कॉलेजला पेपर होता. तिथे गेली असल्याच्या शक्यतेने  मी दुपारी देवगड कॉलेजला जाऊन माझी पत्नी पेपरला आली की नाही याची शिक्षकांकडे चौकशी केली. मात्र, ती पेपरला आली नसल्याचे सांगितले. त्यामुळे ती बेपत्ता झाल्याची माझी खात्री झाली. शेवटी आचरा पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली.

दरम्यान या घटनेमुळे या भागात हळहळ व्यक्त होत आहे. अंतरा हिच्या पश्चात पती, अडीज वर्षाची मुलगी, सासू सासरे चुलत नातेवाईक असा परिवार आहे.