
कणकवली : घोणसरी गावात काल 6 नोव्हेंबर रोजी फासकीत अडकून सापडलेली मादी बिबट ही फोंडाघाट मध्ये मानववस्तीत फिरणारी नसून वनविभाग दिशाभूल करत असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी प्रसिद्धीपत्रकातून केला आहे. पिळणकर यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, घोणसरी गावातील टेम्बवाडी परिसरात डुक्कराच्या शिकारीसाठी अज्ञाताने लावलेल्या फासकीत अंदाजे 4 वर्ष वयाची मादी बिबट सापडली होती. वनविभागाने तात्काळ घटनास्थळी जाऊन त्या बिबट्याची सुखरूप सुटका करून त्यावर वैद्यकीय उपचार करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडले याबद्दल वन अधिकाऱ्यांचे अभिनंदन आहे.
मात्र, पकडण्यात आलेली मादी बिबट ही फोंडाघाट येथील मानवी वस्तीत फिरणारी असल्याचा वनअधिकाऱ्यांनी केलेला दावा दिशाभूल करणारा आहे.कारण फोंडाघात हवेली नगर मध्ये ग्रामस्थांच्या अंगणापर्यंत फिरणाऱ्या मादी बिबटसोबत तिचे दोन बछडे सुद्धा आहेत. मात्र घोणसरी गावात पकडलेल्या मादी बिबट सोबत किंवा जवळच्या परिसरात तिचे दोन्ही बछडे आढळून आले नाहीत. वनविभागाने वन्य प्राण्यांपासून नागरिकांची सुरक्षा करण्याची आपली जबाबदारी झटकण्यासाठी पकडलेली मादी बिबट ही फोंडाघाट परिसरात फिरत असलेलीच बिबट असल्याचा बनाव केला आहे. या मादी बिबट पासून स्थानिक ग्रामस्थांच्या जीवाला आणि त्यांच्या पशुधन मालमत्तेला धोका आहे. वन अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी पाळून फोंडाघाट परिसरात खुलेआम फिरत असलेल्या मादी बिबट पकडून स्थानिकांना दिलासा द्यावा अशी मागणीही पिळणकर यानी प्रसिद्धीपत्रकातून केली आहे.