मिरकरवाडा मत्स्यबंदर प्रकल्पाची कामे गतीने पूर्ण करावी : मंत्री नितेश राणे

मिरकरवाडा मत्स्यबंदर प्रकल्प आढावा बैठक
Edited by:
Published on: February 10, 2025 14:31 PM
views 218  views

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यात मिरकवाडा मत्स्यबंदर प्रकल्प रोजगारनिर्मिती वाढविण्यासाठी महत्वाचा ठरणार आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यावर मासेमारीसाठी पायाभूत सोयी सुविधांचा विकास होवून मत्स्यउत्पादन वाढणार आहे. मिरकरवाडा रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासात ‘मैलाचा दगड’ ठरणारा आहे. या प्रकल्पाचे काम विहीत कालावधीत गतीने पूर्ण  करण्यात यावे, असे निर्देश मत्सव्यवसाय, बंदरे मंत्री नितेश राणे यांनी आज दिले.

मंत्रालयात आयोजित बैठकीत मिरकरवाडा मत्स्यबंदर प्रकल्पाचा आढावा मंत्री राणे यांनी  घेतला. बैठकीला मत्स्यव्यवसाय आयुक्त किशोर तावडे, सहआयुक्त महेश देवरे, मिरकरवाडा प्रकल्पाचे मत्स्य विकास अधिकारी श्रीमती अक्षया मयेकर, मत्स्य व्यवसाय विभागाचे कोकण प्रादेशिक उपायुक्त नागनाथ भादुले आदी उपस्थित होते.

प्रकल्पाच्या टप्पा क्रमांक दोनमधील कामांचा प्राधान्यक्रम ठरवविण्याच्या सूचना देत मंत्री राणे म्हणाले, प्रकल्पाअंतर्गत संरक्षक भिंतीचे काम हाती घेण्यात यावे. निविदा स्तरावरील कामे कशाप्रकारे लवकर सुरू होतील, याबाबत नियोजन करावे. पावसाळ्यापूर्वी प्रकल्पाची कामे पूर्ण झाली पाहिजेत. कुठल्याही परिस्थितीत विलंब होता कामा नये. पावसाळ्यात कामे करता येणार नाही. त्यामुळे सुक्ष्म नियोजन करून कामे सुरू करावीत. या कामांना आवश्यक असणाऱ्या परवानग्यांसाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात यावा. परवानग्या मिळविण्याची कार्यवाही पुढील 15 दिवसांत पूर्ण करावी.

मिरकरवाडा मत्स्यबंदर प्रकल्पातील टप्पा दोनमधील पश्चिमेकडील लाटरोधक भिंतीची लांबी वाढविणे, उत्तरेकडे लाटरोधक भिंत बांधणे, नौकानयन मार्गातील गाळ काढणे, भराव व सपाटीकरण, लिलावगृह, जाळी विणण्यासाठी दोन शेड, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारणे, मच्छिमारांसाठी दोन निवारा शेड बांधणे, पुर्वेकडील ब्रेकवॉटर निष्कासित करणे, अस्तित्वातील धक्का व जेट्टीदुरूस्ती आदी कामे प्रस्तावित आहेत.   टप्पा दोन अंतर्गत एकूण कामे 22 असून 3 कामे पूर्ण झाली आहेत, अशी माहिती बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.