मंत्री उदय सामंत यांच्या बोटीला मांडवा येथे अपघात !

सुदैवाने मोठी दुर्घटना टळली
Edited by: ब्युरो न्यूज
Published on: April 03, 2023 16:27 PM
views 796  views

अलिबाग : महाराष्ट्राचे उद्योगमंत्री तथा रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या स्पीड बोटीला मांडवा येथे अपघात झाला. चालकाचे बोटीवरील नियंत्रण सुटल्याने स्पीड बोट जेटीच्या खांबाना जाऊन धडकली. बोटीचा वेग कमी असल्याने यावेळी सुदैवाने मोठी दुर्घटना घडली नाही.

अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयात शिवराज्याभिषेक सोहळा नियोजनासंदर्भातील बैठकीसाठी सामंत गेट वे ऑफ इंडियावरून मांडवा येथे स्पीड बोटीने निघाले होते. यावेळी छत्रपती संभाजीराजे त्यांच्या समवेत होते. मांडवा जेट्टीजवळ पोहोचल्यावर चालकाने जेटीवर लावण्यासाठी बोट वळवली. मात्र यावेळी चालकाचे बोटीवरील नियंत्रण सुटले आणि बोट जेटीच्या खालील खांबाना जाऊन धडकली. सुदैवाने बोटीचा वेग कमी असल्याने यावेळी मोठी दुर्घटना घडली नाही. नंतर मात्र बोट चालकाने बोटीवर नियंत्रण मिळवून बोट तरंगत्या तराफ्यावर सुखरूप लावली. तेव्हा सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.