
कणकवली : नरडवे धरणामुळे बाधित झालेल्या प्रकल्पग्रस्तांना आर्थिक पॅकेज तसेच हक्काचे भूखंड वाटप करण्याची संधी मला मिळाली. हे आर्थिक पॅकेज व भूखंड हे तुमच्या हक्काचे आहे. या प्रकल्पाला गती देण्याची जबाबदारी माझी असणार आहे. या प्रकल्पाची सुरूवात तत्कालीन पालकमंत्री नारायण राणे यांनी केली होती. या प्रकल्पासाठी ज्यांनी आपली जमीन दिली आहे त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आपण कटीबद्ध असल्याची ग्वाही सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली.
पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत सोमवारी नरडवे येथे भूखंड वाटप शिबिर घेण्यात आले. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते भूखंड वाटपाची पत्रे वितरित करण्यात आली. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी अनिल पाटील, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता पद्माकर पाटील, अप्पर जिल्हाधिकारी शुंभागी साठे, प्रांताधिकारी जगदीश कातकर, जिल्हा पुनर्वसन अधिकाकारी शितल जाधव, तहसिलदार दीक्षांत देशपांडे, कार्यकारी अभियंता विनायक जाधव, माजी जि. प. अध्यक्ष संदेश सावंत, सौ. संजना सावंत, नरडवे सरपंच गणपत सावंत आदी उपस्थित होते.
पालकमंत्री म्हणाले, आजचा दिवस हा ऐतिहासिक आहे. प्रकल्पग्रस्तांना हक्काचे भूखंड मिळत असून हा क्षण सर्वांच्या सहकार्यामुळे साध्य झाला आहे. ज्यांनी ज्यांनी या प्रकल्पासाठी प्रशासनाला साथ दिली, सहकार्य केले त्या सर्वांचे आम्ही मनःपुर्वक अभिनंदन करतो. या प्रकल्पाला खर्या अर्थाने गती आणि आकार देण्याचे काम कोणी केले असेल, आजच्या दिवसाचे श्रेय खर्या अर्थाने कोणाला द्यायचे असेल ते म्हणजे माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांना दिले पाहिजे. या प्रकल्पासाठी ज्यांनी ज्यांनी आपल्या जमिनी दिल्या त्यांना योग्य मोबदला मिळाला पाहिजे, योग्य भूखंड मिळाला पाहिजे ही त्यांची नेहमीच भूमिका राहिली आहे. त्याच मार्गाने आम्हीही चालत आहोत. विविध मंडळे, विविध संघटना यांनी प्रकल्पाला पुढे घेवून जाण्यासाठी सकारात्मक भूमिका घेतली. कुठलाही प्रकल्प होताना इकडे तिकडे काही अडचणी येतातच. इथल्या मंडळांनी योग्यप्रकारे भुमिका आपल्यासमोर मांडली. प्रकल्प झाला पाहिजे ही मानसिकता सर्वांनीच ठेवणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन तसेच मंत्रालयस्तरावरील अधिकार्यांनी आमची भुमिका समजून घेतली आमचे हट्ट पुरवले. कोणावरही अन्याय होता कामा नये ही आमची भुमिका होती. यासाठी आम्हाला ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्यांना आम्ही धन्यवाद देतो.
आम्ही एक भूमिका घेतली की कोणालाही नाराज करायचे नाही, त्यांना शासनाची भुमिका समजून सांगायची, त्यांना कायद्यातील तरतुदी आपल्यापर्यंत पोहोचवायच्या. या कामी जिल्हा प्रशासनानेही चांगली भुमिका घेतली. सकारात्मक मानसिकतेचे अधिकारी असतील तर कुठलीही अडचण येत नाही. याचे उत्तम उदाहरण आहे. जिल्हाधिकार्यांसह सर्व अधिकार्यांचे आपण अभिनंदन करतो, असेही राणे म्हणाले.
याकामी संदेश सावंत यांनीही चांगल्याप्रकारे पाठपुरावा केला त्यांचेही आपण अभिनंदन करतो. ही तर सुरूवात आहे. प्रकल्पग्रस्तांच्या जे जे हक्काचे आहे ते ते त्यांना मिळणारच आहे. या प्रकल्पासाठी शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल अशी ग्वाही मंत्री राणे यांनी दिली.
या कार्यक्रमात जयराम ढवळ, विष्णू ढवळ, श्रीधर पालव, अनंत ढवळ, प्रकाश ढवळ, लवू तेजम, अशोक चव्हाण, संतोष सावंत, आनंद ढवळ, जॉन डिसोजा आणि प्रभाकर ढवळ या लाभार्थ्यांना प्राथमिक भूखंडांचे वाटप करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ व प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.