वेंगुर्ला : तालुक्यातील शिरोडा- केरवाडा येथील समुद्र हा खडकाळ असल्याने साधारणपणे वर्षातून फक्त ६ महिनेच मासेमारी चालते. जास्त वाऱ्याच्या वेळी मासेमारी बंद ठेवावी लागते. यामुळे मच्छिमारांना आर्थिक नुकसानीला समोरे जावे लागत आहे. यामुळे शिरोडा-केरवाडी बंदराला वॉटर ब्रेकिंग बंधारा बांधून तेथील मासेमारी व्यवसाय बारामाही चालू राहील यासाठी आपणाकडून प्रयत्न व्हावेत अशी मागणी निवेदनाद्वारे शिरोडा मच्छिमार सोसायटीच्या संचालक मंडळाने मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्याजवळ केली आहे.
शिरोडा मच्छिमार सोसायटी, केरवाडाच्या संचालक मंडळाने शुक्रवारी (३१ जाने) मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांची भेट घेऊन वॉटर ब्रेकिंग बंधाऱ्याची निवेदनाद्वारे मागणी केली. यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, शिरोडा मच्छिमार सहकारी संस्थेचे चेअरमन काशिनाथ नार्वेकर, सदस्य दिलीप नाईक, पुंडलिक कुबल, सचिव कृष्णा चोपडेकर, संजय धुरी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
या निवेदनात असे म्हटले आहे की, वेंगुर्ला तालुक्यात शिरोडा-केरवाडा हे शेवटचे बंदर असून या बंदरामध्ये शिरोडा-केरवाडा, रेडी, वेळागर, सागरतीर्थ येथील नौका या बंदरामध्ये मासळी विक्री करतात. शिरोडा-केरवाडा हे बंदर अतिशय खडकाळ असल्याने या ठिकाणी मासेमारी साधारणपणे सप्टेंबर ते एप्रिल या हंगामी सीझन मध्ये चालते. संख्येच्या कार्यक्षेत्रामध्ये जवळपास ३ हजार मच्छीमार असून जवळपास ५०० ते ६०० कुटुंबे या व्यवसायावर अवलंबून आहेत. जवळपास यांत्रिक व बिगर यांत्रिक लोकांची संख्या ३५० ते ३६० च्या दरम्यान आहे. शिरोडा-केरवाडा आहे बंदर खडकाळ असल्याने वाऱ्याच्या वेळी मासेमारी बंद असते. साधारणपणे वर्षातून सहा महिने फक्त मासेमारी व्यवसाय चालतो. यामुळे येथील मच्छीमार कर्जबाजारी होऊन उपासमारीची वेळ आलेली आहे. यामुळे येथील मासेमारी व्यवसाय धोक्यात आलेला आहे. याबाबत आपण गांभीर्याने विचार करून शिरोडा-केरवाडी बंदराला वॉटर ब्रेकिंग बंधारा बांधून तेथील मासेमारी व्यवसाय बारामाही चालू राहील यासाठी आपणाकडून प्रयत्न व्हावेत व सर्व मच्छीमारांचे मासेमारी व्यवसायात प्रगती करून द्याल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.