
सावंतवाडी : जेल टूरीझम ही माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांची संकल्पना आहे. केसरकर यांची सगळी स्वप्नं पूर्ण करण्यासाठी मी आहे. माझ्या खांद्यावर जबाबदारी दिली आहे. एका विचारानं काम करणारे आम्ही लोकप्रतिनिधी आहोत. त्यामुळे ऑडिट रिपोर्ट नंतर पुढील १०० वर्ष टीकेल असं काम करू, पर्यटक देखील इथे येतील यासाठीच नियोजन करू अशी ग्वाही जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली. सावंतवाडी येथे पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.
दरम्यान, आरोंदा येथील बेघर होणाऱ्या मच्छिमार बांधवांबाबत विचारलं असता, ते म्हणाले, आरोंदा येथील मच्छिमारांसंदर्भात मी संबंधित तहसीलदार, मत्स्य आयुक्तांशी बोललो आहे. नियमात राहून जी मदत करता येईल ती आम्ही करणार आहे. यासंदर्भात सगळी माहिती मी घेतली आहे. तसेच
सिंधुदुर्गात आत्महत्येच प्रमाण चिंताजनक आहे. एखाद्याने आयुष्य संपवण क्लेशदायक आहे. अंमली पदार्थांचा वापर कमी व्हावा. सामाजिक संतूलन रहावं, सोशल मिडियाचा होणारा अधिक वापर यावर प्रशासन म्हणून बारकाईने लक्ष ठेवून आम्ही आहोत. स्वतःच आयुष्य कोणी संपवू नये हीच अपेक्षा आहे असं श्री. राणे यांनी सांगितले. शक्तीपीठबाबत विचारलं असता ते म्हणाले, मी सरकारचा प्रतिनिधी म्हणून बोलत आहे. जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून सरकारचा एक प्रतिनिधी म्हणून मी बोलतो. कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्री आम्हाला निर्देश देतात त्यानुसारच आम्ही बोलतो. स्वतःच डोकं लावत नाही. त्यामुळे झिरो पॉईंट किंवा मळगावबाबत जे बोललो ते खरं समजाव असं त्यांनी स्पष्ट केले. यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर आदी उपस्थित होते.