
सिंधदुर्गनगरी : तिलारी प्रकल्पाच्या शिरंगे गावच्या बुडीत क्षेत्रातील राहिलेल्या काही झाडे तसेच बांधकामांचे फेर मुल्यांकन होऊन संबंधित शेतकऱ्यांना मोबदला मिळणे आवश्यक आहे. तसेच यापूर्वी करण्यात आलेल्या संयुक्त मोजणी व मुल्यांकनाचा फेर आढावा घेऊन अधिसूचनेपूर्वीच्या झाडे व बांधकामांच्या मुल्यांकनाचा प्रस्ताव शासनाकडे फेर सादर करण्याचे निर्देश देत तिलारी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करणार असल्याचे आश्वासन पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली तिलारी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांबाबत बैठक झाली. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. माणिक दिवे, प्रभारी पोलिस अधिक्षक कृषिकेश रावले, कार्यकारी अभियंता तिलारी प्रकल्प वि.बा. जाधव, उपजिल्हाधिकारी श्रीमती शारदा पोवार, उप विभागीय अधिकारी हेमंत निकम, तसेच भूमिअभिलेख, वन व कृषि विभागाचे अधिकारी तसेच मौजे शिरंगे गावचे अंकुश गवस व इतर प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.
पालकमंत्री पुढे म्हणाले, तिलारी प्रकल्पग्रस्तांच्या एकरकमी अनुदान मंजूर यादीतील प्रकल्पग्रस्तांना अनुदान वाटप करावे, प्रकल्पग्रस्तांनी सादर केलेल्या कागदपत्रांची छाननी व आढावा घेऊन यादीनुसार देय असणा-या प्रकल्पग्रस्तांची यादी पुनर्वसन विभागाकडून जलसंपदा विभागास त्वरीत पाठवावी व जलसंपदा विभागाकडून प्राप्त यादीनुसार एक रकमी अनुदान त्वरीत वाटप करावे. पुनर्वसन विभागाकडून त्यांचे कडील प्राप्त अर्जानुसार छाननी करुन प्रकल्पग्रस्त दाखला व भुखंड देय असणा-या प्रकल्पग्रस्तांना प्रकल्पग्रस्त दाखला व उपलब्ध भूखंड देणेबाबत त्वरीत कार्यवाही करावी अशा सुचना पुनर्वसन विभागाला दिल्या.