मंत्री नितेश राणेंकडून उबाठाला खिंडार ; सावंतवाडीत पक्षप्रवेश !

...त्यांना येणाऱ्या काळात संपवून टाकू : मंत्री नितेश राणे
Edited by: विनायक गावस
Published on: February 21, 2025 21:20 PM
views 244  views

सावंतवाडी : पालकमंत्री म्हणून मी तुमच्या मागे उभा आहे. येत्या काळात शतप्रतिशत भाजप करायचं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महाविकास आघाडीला उमेदवार मिळता नये असं कार्य करा. लोकांनी आपणाला भरभरून दिलेलं आहे, पक्षनेतृत्वही परतफेड करत आहे. त्यामुळे विरोधकांना मदत करू नका, जुन्यांचे संदेश जिल्हाध्यक्षांकडे पोहचवू नका. आमच्या नेत्यांचा अपमान करणाऱ्यांना पक्षात पुन्हा स्थान देणार नाही. आता पोलीसही आमचे आहेत, माझ्यावर केस टाकू शकत नाही. मी काही चुकीच करत नाही. त्यामुळे आमच्या नेत्यांच्या विरोधात जे वळवळ करत होते त्यांना येणाऱ्या काळात संपवून टाकू असा इशारा पालकमंत्री नितेश राणे यांनी दिला. सावंतवाडी येथील भाजपा विधानसभा मतदारसंघ संघटन पर्व बैठकीला उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी शेकडोंच्या संख्येने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या सरपंच, सदस्य व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी पालकमंत्री नितेश राणेंच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. 

यावेळी मंत्री राणे पुढे म्हणाले, भाजप परिवारात मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत सातत्याने हा मतदारसंघ चर्चेत होता. अनेक चर्चा असताना आमच्या कार्यकर्त्यांनी निस्वार्थी पद्धतीने केलेलं काम कौतुकास्पद आहे. पक्ष संकटात असताना स्वतःचा विचार न करता पक्षाचा झेंडा हाती घेऊन त्यांनी काम केलं. पक्ष संघटना संपवण्याच काम स्वकीयांंनी केलं, यांना विकत घेण्याचा प्रयत्न झाला. मात्र, इथले कार्यकर्ते पक्षाशी एकनिष्ठ राहिले. ज्यांना आम्ही मोठं केलं ते पक्षाच्या विरोधात उभे राहिले. मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या स्वभावाचा गैरफायदा घेतला. पक्ष सोडताना रविंद्र चव्हाण यांच्याकडून घेतलेल्या निधीतून केलेली कामं आपणच केल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे मागच्या चुका पुन्हा होता नये याची काळजी आपल्याला घ्यावी लागेल. अन्यथा, कार्यकर्त्यांचा संयम राहणार नाही असं विधान केले. 


तसेच मंत्रालयात बाहेर जाऊन कारकुनाला भेटणारे बावनकुळेंना भेटलो असं काहीजण सांगता असा खोचक टोला श्री. राणेंनी नाव न घेता राजन तेलींवर हाणला. आपले कार्यकर्ते फार बारकाईने आपल्याकडे बघत आहेत. त्यामुळे या पुढची निवडणूक प्रामाणिक कार्यकर्त्यांना घेऊनच होईल असा शब्द त्यांना दिला पाहिजे. निवडून काळात आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांचा कॉल रेकॉर्डींग व्हायरल करायचा प्रयत्न काहींनी केला. राणेंच्या विरोधात आपण कसं बोलतो हे दाखवण्याचा प्रयत्न केला. आमच्या प्रमुखांची कोणी बदनामी करत असेल तर खपवून घेणार नाही. अशी माणसं परत दिसली तर त्यांचा कार्यक्रम कार्यकर्त्यांनी करावा, कारवाई होणार नाही. कोणी कितीही प्रयत्न केला तरी मी दरवाजावर उभा आहे अस मत व्यक्त केलं. तसेच सावंतवाडी मतदारसंघात बाहेरची घाण नको. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल सगळं चित्र परफेक्ट झालं आहे. बाप गेला अन् दोन्ही मुलंही गेली. येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समितीसह नगरपरिषद निवडणूकांत ताकदीने उतरायचं आहे. खरी ताकद सावंतवाडीन दाखवून दिली असून आमदार भाजपचा नसताना पक्षाला सभासद नोंदणीतून दाखवलेल्या ताकदीची दखल पक्षनेत्यांनी घेतली आहे. रविंद्र चव्हाण, नारायण राणे, चंद्रशेखर बावनकुळे यांच लक्ष आपल्यावर आहे. महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर निवडून येण्यात भाजपचा मोठा वाटा होता. तेही ते मान्य करतील, आपला वाटा सिंहाचा होती की खारीचा. आता पालकमंत्री भाजपचा आहे.पहिलं प्राधान्य भाजपला आहे. जे भाजप महायुतीचे सरपंच नाही त्यांना निधी नाही. मला कोण त्याबद्दल विचारणारही नाही. पक्ष वाढवायचा अधिकार आम्हाला आहे. शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष वाढवताना भाजपने गोट्या खेळायच्या का ? अस मत व्यक्त केल. तसेच नविन आर्थिक वर्षात सरपंचांची यादी मी घेउन बसणार आहे. उबाठाला शुन्य टक्के निधी देणार हे निश्चित आहे. भाजपचे खासदार, मुख्यमंत्री, पंतप्रधान आहेत हे कुणीही विसरू नये. तुमची सत्ता आलेली आहे‌. समित्या, पदांवर भाजपच्या कार्यकर्त्यांना प्राधान्य दिले जाईल. संधीच सोन करा असं आवाहन राणेंनी कार्यकर्त्यांना केलं. 

दरम्यान, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आमच्यावर अन्याय झाला. सगळी कामं नाकारली, निधी दिला नाही. महाविकास आघाडीच्या काळात सगळे अनुभव आम्ही घेतले. सगळ्या प्रकल्पांना स्थगिती देण्याच काम केलं आहे. आमच्या लोकांना जेलमध्ये टाकल गेलं. आता जंगल दाखवायचं काम आम्ही करणार आहोत. कर्जाची परतफेड व्याजासह करणार आहोत. मी पालकमंत्री झालो म्हणून काहीजण गोव्यात जात आहे. मालमत्ता विकत आहेत. पण, गोव्यातही मुख्यमंत्री भाजपचे प्रमोद सावंत आहेत हे लक्षात ठेवावं असा इशारा नितेश राणेंनी दिला. उबाठा व महाविकास आघाडीच गाव टार्गेट करा, गाडीत बसवून भाजपात प्रवेश द्यायचा कार्यक्रम करा अस आवाहन श्री. राणेंनी केले. 


याप्रसंगी मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते दोडामार्गमधील तळेखोल, पिकुळेतील उबाठा शिवसेना, हेवाळे सरपंच साक्षी देसाई, जान्हवी खानोलकर आदींसह शेकडो पदाधिकारी , कार्यकर्ते यांनी भाजपचा झेंडा हाती घेत पक्षप्रवेश केला. बांदा मंडलातील उबाठा शिवसेनेचे प्रमुख उल्हास परब व शेकडो कार्यकर्त्यांनी, इन्सुलीचे सचिन पालव, संतोष मांजरेकर, निगुडे माजी सरपंच समीर गावडे आदी कार्यकर्त्ये,  शेर्ले गावातील एकता केरकर यांसह उबाठाच्या कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. पानोसे वाडी शेर्ले अनिल राऊळ यांसह उबाठा कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.दांडेलीतील विठू शेळके, धाकू खरात आदींसह ग्रामस्थांनी प्रवेश केला. सातेरी महिला विकास सोसायटी चेअरमन स्नेहल बांदिवडेकर यांनी भाजपात जाहीर प्रवेश केला.वेंगुर्ला तालुक्यातील तुळस येथील शामसुंदर राय, प्रकाश वारंग आदींसह असंख्य जणांनी भाजपात जाहीर प्रवेश केला.  सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाकडून पालकमंत्री नितेश राणे यांचा नागरी सत्कार यावेळी करण्यात आला. दादा मालवणकर यांच्या हस्ते शाल, श्रीरामाची प्रतिमा देऊन हा गौरव करण्यात आला.यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, ज्येष्ठ भाजप सदस्य दादा मालवणकर, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगांवकर, जिल्हा सरचिटणीस महेश सारंग, आंबोली मंडल अध्यक्ष रविंद्र मडगांवकर, बांदा मंडल अध्यक्ष महेश धुरी, शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, दोडामार्ग तालुकाध्यक्ष सुधीर दळवी, दोडामार्गचे माजी नगराध्यक्ष चेतन चव्हाण, माजी नगराध्यक्ष संतोष नानचे, वेंगुर्लेचे माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, जिल्हा कार्यकारिणी सदस्य तथा माजी नगरसेवक मनोज नाईक,  चंद्रकांत जाधव, युवा मोर्चा मंडल अध्यक्ष सिद्धेश कांबळी, महिला शहर अध्यक्षा मोहिनी मडगांवकर, माजी जि.प. अध्यक्षा रेश्मा सावंत, माजी सभापती गुरुनाथ पेडणेकर, प्रमोद कामत, माजी न.प. सभापती ॲड. परिमल नाईक, सुधीर आडिवरेकर, आनंद नेवगी, गुरुदास मठकर, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष प्रमोद गावडे, प्रविण देसाई, मधुकर देसाई आदी उपस्थित होते.


यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी म्हणाले, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाला लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर उर्जीतावस्ता प्राप्त झाली.  आगामी काळात मोठ्या संख्येने प्रवेश होणार आहेत. ५४ हजारहून अधिक सभासद नोंदणी या मतदारसंघात झाली आहे. महेश सारंग यांनी यासाठी मेहनत घेतली आहे. संपूर्ण कोकणात सावंतवाडी मतदारसंघ एक नंबरला आहे. या पुढचा काळ आपला आहे‌. विकासाच राजकारण करताना रोजगार निर्मिती आपल्याला करायची आहे. मतदारांना दिलेला विश्वास पूर्णत्वास न्यायचा आहे असं मत श्री. दळवी यांनी व्यक्त केले.

तसेच जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, सावंतवाडी मतदारसंघात केलेल्या संघटनात्मक कामाचा फायदा भविष्यात आपल्याला होणार आहे. महेश सारंग, मनिष दळवींसह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते मेहनत घेत आहे. देशात नरेंद्र मोदी, राज्यात देवेंद्र फडणवीस व जिल्ह्यात खा. नारायण राणे, मंत्री नितेश राणे यांच्या कार्यान प्रेरीत होऊन अनेक जण पक्षात प्रवेश करत आहेत. तुमच्या अपेक्षा पुर्ण करण्यासाठी वरिष्ठ सक्षम आहेत. येणाऱ्या निवडणुकांत भाजपसमोर त्या तोडीचा विरोधी पक्ष समोर नसेल असं विधान श्री. सावंत यांनी केल. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रविंद्र मडगावकर तर आभार श्वेता कोरगावकर यांनी मानले.