
सावंतवाडी : छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीने लढा दिला आणि हिंदवी स्वराज्य निर्माण केले त्या इतिहासाचा आपण गौरवाने उल्लेख करतो. मात्र, हे हिंदवी स्वराज्य आपल्याला टिकवायचे आहे. आजही आपल्यावर अनेक अतिक्रमणं होत आहेत. ही अतिक्रमणे रोखण्यासाठी आपणही आता सजग व्हायला हवे व हिंदुत्वासाठी एकत्र यायला हवे असे प्रतिपादन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.
अखिल भारतीय मराठा महासंघ सावंतवाडी शाखा उत्तम काम करत आहे. या शाखेच्या सर्व उपक्रमांना सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माझे नेहमीच सहकार्य राहील. तसेच हा शिव उत्सव कार्यक्रम भविष्यात मोठा महोत्सव होईल या दृष्टीने प्रयत्न करा त्यासाठीही मी संपूर्ण सहकार्य करीन अशी ग्वाही नितेश राणे यांनी यावेळी दिली. शिवजयंती महाउत्सव मराठा महासंघाने यंदा पहिल्यांदाच सुरू केला आहे. यापुढे हा महोत्सव भव्य दिव्य स्वरूपात साजरा करा, त्याला सर्वतोपरी सहकार्य करेन असेही त्यांनी स्पष्ट केले.
सावंतवाडी शिवउद्यान येथे अखिल भारतीय मराठी महासंघ सावंतवाडी शाखेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त शिवउत्सव महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचे उद्घाटन नितेश राणे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर अखिल भारतीय मराठी महासंघाचे तालुकाध्यक्ष अभिषेक सावंत, माजी उपनगराध्यक्ष उमाकांत वारंग, मराठा महासंघाचे नेते सुरेश गवस, जिल्हा बँकेचे चेअरमन मनीष दळवी, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष उदय भोसले, अखिल भारतीय मराठा महासंघाचे व्यापारी सेलचे जिल्हाध्यक्ष पुंडलिक दळवी, ॲड. संदीप निंबाळकर, ॲड. शामराव सावंत, संजय लाड, अपर्णा कोठावळे, प्रशांत कोठावळे, श्री. घाटकर श्री. राऊत, दिगंबर नाईक आदी उपस्थित होते.