दलित समाजाच्या विकासासाठी २० कोटी रु. निधी मंजूर करावा

अंकुश जाधव यांनी वेधलं मंत्री नितेश राणेंचं लक्ष
Edited by: विनायक गांवस
Published on: December 28, 2024 19:14 PM
views 125  views

सावंतवाडी : अनुसूचित जाती व बौद्ध घटकांचा विकास करणे या योजनेतून आज घडीला फक्त ४ कोटी एवढाच निधी जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाकडे प्राप्त झाला आहे. ५४० वस्त्या असून अंदाजे ९०० प्रस्ताव मंजुरी साठी आहेत. हा निधी पुरेसा नसल्याने आमचा समाज विकासापासून वंचित राहणार आहे. त्यामुळे दलित समाजाच्या विकासासाठी या आर्थिक वर्षात २० कोटी रु. निधी मंजूर करावा व तसे आदेश जिल्हाधिकारी व सहाय्यक आयुक्त समाजकल्याण सिंधुदुर्ग यांना द्यावेत, असे निवेदन माजी समाजकल्याण सभापती तथा भाजपा जिल्हा प्रवक्ते अंकुश जाधव यांनी मस्त्योद्योग व बंदर विकास मंत्री नामदार नितेश राणे  यांना दिले.

नामदार राणे यांना सादर केलेल्या निवेदनात माजी समाजकल्याण सभापती तथा भाजप जिल्हा प्रवक्ते जाधव यांनी नमूद केले आहे की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुमारे ५४० वस्त्या आहेत त्या दरवर्षी वाढ होत आहे. या समाजाच्या विकासासाठी दरवर्षी जिल्हाधिकारी व सहाय्यक आयुक्त समाजकल्याण राज्य शासन विभाग कडून निधी जी. प. च्या समाजकल्याण निधी वर्ग केला जातो. दरवर्षी हा निधी वाढता असतो. मात्र यावर्षी फक्त चार कोटी रु.निधी आतापर्यन्त प्राप्त झालेला आहे.हा निधी पुरेसा नाही.यातून प्राप्त प्रस्ताव नुसार विकास कामे मंजूर करताना अडचणी होणार आहेत. परिणामी आमचा गरीब समाज विकासासापासून वंचित राहणार आहे.गेल्या वर्षी हाच निधी ११ कोटी ७८ लाख एवढा मिळाला होता.

मात्र यावर्षी निधी कमी प्राप्त झाला आहे. जिल्हातील दलित जनतेचा विकास व्हावा यासाठी या आर्थिक वर्षात २० कोटींचा निधी मंजूर करावा अशी मागणी निवेदन देत नामदार राणे यांचे कडे केली आहे. तसे आदेश जिल्हाधिकारी व सहाय्यक आयुक्त समाजकल्याण यांना द्यावेत असे नमूद केले आहे. यावेळी कणकवली माजी नगरसेवक गौत्तम खुडकर, अजित तांबे, यशोधन सर्पे, सरपंच सुशील कदम, किरण जाधव, सुंदर जाधव, राजू जाधव आदी उपस्थित होते.