शिक्षकांच्या प्रेमाने मंत्री केसरकर भारावले

भगवी शाल, फेटा, घोंगड काठी देऊन सत्कार !
Edited by:
Published on: November 15, 2024 14:04 PM
views 328  views

सावंतवाडी : विनाअनुदानित महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटनेच्या माध्यमातून मंत्री केसरकर यांना पाठिंबा दर्शत खास कोल्हापुरी पद्धतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. फुलांची उधळण करत शिक्षकांनी त्यांचे ऋण व्यक्त केले. दीपक केसरकर मोठ्या मताधिक्याने विजयी व्हावे व पुन्हा एकदा राज्याचे शालेय शिक्षणमंत्री व्हावेत असा नवस आम्ही बालाजीला केला आहे. त्यांच्या विजयानंतर कोल्हापूरातून मंत्री केसरकर हत्तीवरून मिरवणूक काढणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शिक्षक संघटनेचे राज्य  उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांनी केले.

 ‌ते म्हणाले, दीपक केसरकर यांचा सत्कार करण्यासाठी आम्ही आलो आहोत. ७० हजार शिक्षकांना अनुदान देण्याचे काम श्री. केसरकर यांनी केलं आहे.‌ ते मोठ्या मताधिक्याने विजयी व्हावे व  पुन्हा एकदा तुम्ही शिक्षणमंत्री व्हावे यासाठी बालाजीला नवस केला आहे. बिरोबाची मानाची काठी अन् घोंगडं सोबत घेऊन आलोय असे  महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शिक्षक संघटनेचे राज्य  उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांनी सांगितले.  विजयानंतर कोल्हापूरातून मंत्री केसरकर यांची हत्तीवरून मिरवणूक काढणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले. 

गेली 20 वर्ष महाराष्ट्र राज्यातील विनाअनुदानित व अंशता: अनुदानित शाळांना टप्पा अनुदान मंजूर केले नव्हते. मात्र, शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी 20 टक्के, 40 टक्के, 60 टक्केवरून 80 टक्के अनुदान टप्प्याटप्प्याने मंजूर केले आहे. तसा अध्यादेशही काढण्यात आला आहे. त्यामुळे विनाअनुदानित महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटनेच्या माध्यमातून मंत्री केसरकर यांना पाठिंबा दर्शवण्यात आला आहे. सावंतवाडी येथील त्यांच्या निवासस्थानी राज्य संघटनेच्या वतीने मंत्री केसरकर यांचा कोल्हापुरी पद्धतीने घोंगडे , काठी आणि फेटा बांधून सत्कार करण्यात आला. यावेळी राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे, सावता माळी, राजू भोरे, श्रीमती नेहा भुसारे, अर्चना टोणपी, आप्पासाहेब टोणपी, तानाजी पाटील, आनंदा पाटील यासह मोठ्या संख्येने राज्यभरातील शिक्षक या सत्कार सोहळ्याला उपस्थित होते. 

यावेळी दीपक केसरकर म्हणाले, शिक्षकांचे सर्व पक्ष मी सोडवले आहेत. टप्पा अनुदान प्रश्न सोडवला आहे. जुनी पेन्शन योजनेची केस सुप्रीम कोर्टात राखीव आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कमिटी नेमली आहे. कमिटीच्या अहवालानंतर कोणत्याही प्रकारचे प्रश्न प्रलंबित राहणार नाही. गुरूजन वर्ग खुष असतील तर ते मुलांना चांगला न्याय देऊ शकतात. ही भुमिका घेऊन मी काम केलं. टप्पा अनुदानाचा प्रश्न सोडवला, शिक्षक भरती, केंद्रप्रमुख भरती मोठ्या प्रमाणात केली‌. कला क्रिडा, अपंग समायोजित शिक्षकांना न्याय दिला. ग्रंथपाल, लॅब असिस्टंट यांच अनुदान दहा पटीने वाढवलं. शिक्षक सेवकांचे मानधन वाढवलं‌ असे मत श्री. केसरकर यांनी व्यक्त केले. काम केल्यानंतर त्याची जाणीव ठेवली जाते हे पाहून आनंद झाला‌. टप्पा अनुदानातील ७० हजार शिक्षकांना टप्पा अनुदान देण्यात आले. अकराशे कोटींची रक्कम त्यासाठी लागली. त्या शिक्षकांचं प्रेम आज दिसून आले असे प्रतिपादन दीपक केसरकर यांनी केले.