114 शाळांमध्ये शिक्षकांच्या निर्माण झालेल्या प्रश्नाला मंत्री केसरकर जबाबदार

राजन तेलींचा आरोप
Edited by: विनायक गावस
Published on: July 05, 2023 16:35 PM
views 121  views

सावंतवाडी : सिंधुदुर्गात राबविण्यात आलेली शिक्षकांची आंतर जिल्हा बदली प्रक्रिया पुर्णपणे चुकीची झाली  त्यामुळेच जिल्ह्यातील तब्बल 114 शाळांमध्ये आज शिक्षकांचा प्रश्न निर्माण झाला आहे. याला शिक्षण मंत्री दीपक केसरकरच जबाबदार आहेत त्यामुळे त्यांनी काय चुकले याचे आत्मपरीक्षण त्यांनी करावे असा  सल्ला भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आज येथे दिला. तर जिल्ह्यातील सरपंचांनी आगामी काळात तब्बल 1 हजार कोटी रुपयांची कामे सुचवावीत सार्वजनिक बांधकाम मध्ये रवींद्र चव्हाण यांच्यामाध्यमातून त्यासाठी आवश्यक असलेला निधी प्राप्त करून देण्यासाठी आम्ही पुढाकार घेऊ असेही त्यांनी सांगितले.

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील सरपंच उपसरपंच यांची बैठक आज श्री तेली यांच्या अध्यक्षतेखाली सावंतवाडीत पार पडली या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत माजी नगराध्यक्ष तथा भाजपा जिल्हा प्रवक्ते संजू परब, जिल्हा बँक संचालक रवींद्र मडगावकर, भाजपा सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष दीपक नाईक,आनंद नेवगी,बंटी पुरोहीत, अजय सावंत, संदिप नेमळेकर आदी उपस्थित होते. श्री तेली पुढे म्हणाले, शालेय शिक्षण मंत्री केसरकर हे आपल्या खात्याला न्याय देण्यात अपयशी ठरले आहे त्यांना योग्य मॅनेजमेंट ची गरज असून त्यांनी जिल्ह्यातील शिक्षकांची केलेली आंतरजिल्हा बदली हे पूर्णतः चुकीची होती त्याने हा निर्णय घेताना विचार करणे गरजेचे होते त्यांच्या एका चुकीच्या बदलामुळे आज तब्बल 114 शाळांना एकही शिक्षक नाही त्यामुळे मुलांच्या शिक्षणावर परिणाम झाला आहे दुसरीकडे जिल्ह्याच्या शिक्षण खात्यामध्ये रिक्त पदांची अडचण भासत आहे त्यामुळे त्यांना आता आत्मपरीक्षण करण्याची खरी गरज आहे. राज्यात होणाऱ्या नव्याने शिक्षक भरती मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार करता या ठिकाणी 80 टक्के स्थानिकांना प्राधान्य द्यावे अशी प्रमुख मागणी आम्ही करणार आहोत. उर्वरित बाहेरील शिक्षकांना त्यांना किमान दहा वर्ष बदली मिळता कामा नये याचीही तरतूद करा अशीही मागणी असणार आहे.

ते पुढे म्हणाले,  सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बजेटमधून गतवर्षी रस्ते विकासासाठी ४५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली होती. मात्र, यावर्षी तब्बल १ हजार कोटींची तरतूद व्हावी अशी अपेक्षा असून यासाठी सरपंच व स्थानिक भाजपा पदाधिकारी यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त कामे सुचवली जावीत, अशा सूचना आज झालेल्या सरपंच संघटनेच्या बैठकीत करण्यात आली आहे. शिवाय भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी संघटनेच्या कामात सक्रिय सहभाग घ्यावा अशा सूचना सरपंच संघटनेच्या बैठकीत करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे जिल्हा नियोजन तसेच आमदार खासदार निधीसाठी कामे सुचविताना देखील सरपंच उपसरपंच तसेच स्थानिक भाजपा शक्ती केंद्रप्रमुख अथवा बुथ अध्यक्ष यांना विश्वासात घेऊन ती सुचवली जावेत अशा सूचनाही यावेळी करण्यात आल्या.

मोदी @ ९ च्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावे व केंद्राच्या माध्यमातून गेल्या नऊ वर्षात झालेली विविध विकास कामे तसेच केंद्र सरकारने घेतलेले लोकोपयोगी निर्णय त्याचप्रमाणे लोकांसाठी मिळणाऱ्या सुविधा याबाबत जनतेपर्यंत पोहोचून त्यांना त्याची माहिती देण्यात यावी. यासाठीही सरपंच उपसरपंच यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत मिळून काम करावीत असे सांगण्यात आले.

शिवाय स्थानिक पातळीवर काम करतांना सरपंच उपसरपंच यांना उद्भवणाऱ्या समस्या त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या गेल्या. विकास कामे करताना त्याचप्रमाणे पंधरावा वित्त आयोग साठीची अंदाजपत्रके वेळेत न मिळणे अशा प्रशासकीय अडचणी निर्माण होतात. याबाबत येत्या सोमवारी जिल्हाधिकारी तसेच जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना घेऊन चर्चा करून या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. 

ठेकेदारांची मक्तेदारी मोडीत काढू

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात ठेकेदारांची मक्तेदारी निर्माण झाली आहे. बांधकाम विभागाकडे कामे मंजूर होऊन आल्यानंतर ती कामे मिळविण्यासाठी या ठेकेदारांकडून सर्व प्रकारचे प्रयत्न केले जातात. मात्र, कामे पूर्ण होताना दिसत नाहीत. तसेच अनेक ठिकाणची कामे ही अत्यंत निकृष्ट पद्धतीची होत असल्याच्या तक्रारी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील ठेकेदारांची ही मक्तेदारी मोडीत काढणार असून अशा ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट केले जाईल असा इशारा भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दिला.