आरोप करणाऱ्या आणि अन्य राजकीय लोकांना तब्बल साडे तीन लाखांची टक्केवारी वाटली

राजेंद्र म्हापसेकर यांचा गौप्यस्फोट
Edited by: संदीप देसाई
Published on: February 22, 2023 10:04 AM
views 181  views

दोडामार्ग : होय मी ठेकेदार आहे, ठेकेदारी हा माझा व्यवसाय आहे, मात्र मला याच व्यवसायातून मी पक्षप्रवेशाची ऑफर नाकारल्याने राज्याचे शालेय शिक्षणमंत्री आणि सावंतवाडी विधानसभा मतदार संघाचे आमदार दीपक केसरकर आणि त्यांचे दोडामार्गमधील पदाधिकारी माझ्या ठेकेदारी व्यवसायावरुन नाहक वेठीस धरत आहेत, बदनामी करत आहेत. आम्ही व्यवसाय करून समाजात काम करत आहोत मात्र टक्केवारी घेणाऱ्यांनी मला प्रामाणिकपणाचे धडे शिकऊ नयेत. हे जर वेळीच नाही थांबल तर कोण कोण टक्केवारी घेतात, आणि मंत्री महोदय नेमकी कसली काम करतात हे पुराव्यानिशी उघड केल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा रोखठोक इशारा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनी दीपक केसरकर आणि शिवसेनेला दिला आहे. तर बाबूराव धुरी यांच्याशी संगनमत करून आंदोलन घडविण्याचा आमचा संबंध काय? धुरी हे काय राजकारणात नवखे नाहीत, त्यांच्या जागी राजकीय विरोधक म्हणून मी असतो तरीही त्यांनी केलं ते मीच केलं असतं. त्यामूळे नाहक आरोप प्रत्यारोप करणे बंद करा असेही त्यांनी म्हटले आहे.

साटेली-भेडशी आरोग्य केंद्र इमारत, मोर्ले - पारगड रस्ता आदीवरून शिवसेनेचे तालकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, राजेंद्र निंबाळकर, गोपाळ गवस यांनी आरोप केले होते, त्याला मंगळवारी म्हापसेकर यांनी पत्रकार परिषद घेत जोरदार हल्ला चाडविला. यावेळी त्यांचे समवेत सरगवे येथील माजी ग्रा. पं. सदस्य व भाजप पदाधिकारी शंकर देसाई उपस्थित होते.


सुरवातीपासूनच पत्रकार परिषदेत आमदार व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, राजेंद्र निंबाळकर, गणेशप्रसाद गवस, गोपाळ गवस यांना लक्ष बनवीत त्यांचेवर जोरदार हल्ला चडवित आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. ते म्हणाले, १९९० मध्ये ठेकेदार व्यवसाय सुरु केला. आणि १९९१ मध्ये मी राजकीय क्षेत्रात आलो. मी ठेकेदार आहे म्हणुन सांगायला मला कसलीही लाज वाटत नाही. उलट मला माझ्या व्यवसायाचा सार्थ अभिमान आहे. केवळ टक्केवारी आणि कामांची ठेकेदारी. मिळविण्यासाठी साटेली भेडशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीवरून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नाहक राळ उठविली आहे.


वास्तविक सिंधुदुर्ग जि. प. च्या तत्कालिन अध्यक्षा रेश्मा सावंत यांच्या कालावधित या आरोग्य केंद्रासाठी निधी मिळाला असुन जि. प. मध्ये मी उपाध्यक्ष असताना आणि तत्कालिन जि. प. सदस्य अंकुश जाधव यांनी यासाठी निधीची मागणी लावुन धरली होती. केंद्रीयमंत्री नारायण राणे, आम नितेश राणे, तसेच रेश्मा सावंत यांना या इमारतीच्या कामाचे खरे श्रेय जाते. दोडामार्गातील शिवसेनेचे जे पदाधिकारी आज आरोप करत आहेत त्यांचे नेते तथा मंत्री केसरकर यांच हा निधी आणण्यात योगदान होतं का, त्याचा शोध घ्यावा. कोरोना कालावधी संपल्यानंतर अतिशय जलद रितीने हे काम झाले असुन कोरोनामध्ये माझ्या प्रत्येक कामगाराला त्रास झाला होता, तर माझा गवंडी कामगार कोरोनामुळे मयतही झाला. हे काम पूर्ण होण्यास वेळ लागला हे खरं आहे आणि त्यासाठी आम्ही जनतेची माफीही मागतो. मात्र काम पूर्ण झालेवर आमदारांनी या आरोग्य केंद्राचं प्राधान्याने उद्घाटन करायला हवं होत. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना सदर इमारतीचे काम पुर्ण झाल्याचे पत्र ६ महीन्यापुर्वीच देण्यात आले असून, पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी देखील स्थानिक आमदारांकरवी आरोग्य केंद्राचे उद्घाटन करून घ्यावे, अशी सुचना दिली होती. मात्र मंत्री केसरकरांना वेळ नसल्यामुळे हे उद्घाटन होउ शकले नाही, असेही म्हापसेकर यांनी आवर्जून सांगितलं.

   

गावातील प्रश्न पाहिले सोडवा - गणेशप्रसाद गवस यांनाही केलं लक्ष


झोळंबे गावातील मुख्यमंत्री ग्रामसडक योजेअंतर्गत मंजूर काम तेथील एकाने अडविल आहे. याबाबत मी स्वतः गणेशप्रसाद गवस यांना कल्पना दिली असुन माझ्यावर टीका करत बसण्याऐवजी त्यांनी तो गावचा प्रश्न आदी सोडवावा आणि मग अन्य ठिकाणी पाहाव. तर प्रेमानंद देसाई हे सुज्ञ आहेत यांचेकडून आपल्याला अशी अपेक्षा नसल्याच ते म्हणाले.


गोपाळ गवस यांनी शुद्धीत राहून बोलावं... 


शिवसेनेचे गोपाळ गवस यांच्यावरही म्हापसेकर यांनी निशाणा  साधला. दिवसभर आर्थिक समीकरणे आणि रात्री शुद्धीत नसणाऱ्या  गोपाळ गवस यांची माझ्यावर टीका करण्याची पात्रताच नाही. त्यांच्या वडीलांचा आणि मोर्ले ग्रामस्थांचा आदर ठेवुन मी यावेळी गप्प बसतो आहे. मात्र यापुढे माझ्याविरुद्ध नाहक बोलल्यास गोपाळ गवस यांना योग्य धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असा सडेतोड इशारा श्री. म्हापसेकर यांनी दिलाय.


ठेकेदारीसाठी सगळे पक्ष बदलणाऱ्याने मला नैतिकता शिकऊ नये


 स्वतः काचेच्या घरात राहून दुसऱ्यावर दगड मारु नयेत, मुळात केवळ ठेकेदारी मिळविण्यासाठी सगळ्या राजकीय पक्षांची दारे ठोठावणाऱ्या राजेंद्र निंबाळकर यांनी मला नैतिकता शिकवू नये. ज्या निंबाळकर यांनी मांगेलीत रस्त्याची दुर्दशा केलीली आणि हा मुद्दा आमसभेत लोकांनी मांडल्यावर त्यांना ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्याचे आदेश केसरकर यांनी  दिले होते, आज हे दोघेही एकत्र आलेत, याचा विसर पाडून दुसऱ्याकडे बोटे दाखवण्यापेक्षा त्यांनीही अनेक गावात कामे पूर्ण करावीत. आज ज्या हेवाळे पुलाचे काम निंबाळकर करत आहेत, ते काम मला मिळाले होते, ते आपल्या पदरात घालून घेण्यासाठी निंबाळकर आणि आमदार यांनी काय काय केलं ते मला उघड करायला लाऊ नये. केवळ ग्रामवासियांच्या हितासाठी आपण न्यायालयात गेलो नाही, हे त्यांनी विसरू नये. 'जिथे सत्ता तिथ मी' अशीच भूमिका या निंबाळकराची स्वतः च्या स्वार्थासाठी असते, असेही श्री. म्हापसेकर यांनी सांगितले. यापुढे त्यांना जशास तसे उत्तर दिलं जाईल एवढं त्यांनी ध्यानात ठेवावं असं ते म्हणाले.


मोर्ले पारगड रखडायला वनखाते प्रशासन जबाबदार


ज्या मोर्ले- पारगड या रस्त्यावरून मला टार्गेट केलं जातंय त्याच काम आपल्याकडुन जवळजवळ ८० टक्के पूर्ण झाले आहे. उर्वरित कामाची देखील सर्व तयारी करून ठेवण्यात आली आहे. वनविभागाकडुन आवश्यक ती पुढील परवानगी व कार्यवाही झाल्यास लगेच या रस्त्याचे काम सुरु होईल. ही परवानगी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या आमदारांकरवी पूर्ण करून द्यावी, तेथील लोकांचे भूसंपादन व वनखाते अडचण दूर केल्यास मला काम करायला काही अडचण नाही, उलट त्या रस्त्यावर माझी अजूनही खडी पडलेली आहे, असेही शेवटी राजेंद्र म्हापसेकर यांनी स्पष्ठ केले.


यापुढे जपून बोला अन्यथा पुढच्या परिणामांना जबाबदार राहा


दरम्यान, मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राजेंद्र म्हापसेकर यांची आक्रमकता कमालीची होती. राजकारणात कट शाह चे राजकारण करण्यासाठी राजकीय पक्षाचे पदाधिकारी एकमेकांना कोंडीत पकडण्यासाठी काय काय करू शकतात याचे दाखले, पुरावे देणारी अशीच होती.


श्री. म्हापसेकर यांनी आमदार दीपक केसरकर यांनी आपल्याला सार्वजनिक बांधकाम, तिलारी पाठबंधारे विभाग व ग्रामसडक विभाग येथील अधिकाऱ्यांचा वापर करून कसं जेरीस आणलं, याचा पाढाच वाचला. तर आपण राजकीय पदाधिकारी असूनही आरोप करणाऱ्या आणि अन्य राजकीय लोकांना तब्बल साडे तीन लाखांची टक्केवारी वाटली, असा गौप्यस्फोट केला. यावरून आजच राजकारण नेमकं कुटच्या दिशेने चाललय हे सुध्दा समाजाने विचार करण्याजोगे आहे. जे काही चाललय ते केवळ टक्केवारी साठी, बदनामिसाठी असं जेंव्हा एक जबाबदार पदाधिकारी बोलतो त्यावेळी पाणी कुठं तरी नक्कीच मुरतंय, असं म्हणण्यास मोठा वाव असतो.