
सावंतवाडी : शिवरायांचा विचार हा कोणत्याही काळात प्रत्येक संकटावर मात करून देणारा एक संस्कार आहे. तो आत्मसात करण्यासाठी आणि नवीन इतिहास घडवण्यासाठी सावंतवाडीकरांनी शिवरायांच्या जीवनावर आधारित नाट्यमहोत्सवाचा आनंद घ्यावा असे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले आहे. दीपक केसरकर मित्रमंडळ आणि मातृभूमी शिक्षण संस्थेच्या शिवसंस्कार यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या ऐतिहासिक नाट्य महोत्सवाचे उद्घाटनप्रसंगी ऑनलाईन पद्धतीने शालेय शिक्षण मंत्री केसरकर बोलत होते.
शनिवारी येथे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या नाट्य महोत्सवाचे दीपप्रज्वलनाने उद्घाटन करण्यात आले. यावेळी सरपंच सेवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रेमानंद देसाई, बाळासाहेब वाडकर, ॲड. निता कविटकर, डॉ. सोनल लेले, भरत गावडे, भारती मोरे, अनारोजिन लोबो, कल्पना बांदेकर, निकिता परब, सुरेश गावडे, रत्नाकर नेळी, दीपक परब, किशोरी तेजम, उर्मिला राणे, प्रांजल टिळवे, आर्या चौकेकर, सिद्धी हवालदार आदी मान्यवर उपस्थित होते.
येथील पालिकेच्या बॅ नाथ पै सभागृहात शिवराज्यभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून "रायगडाला जेव्हा जाग येते" हा नाट्य प्रयोग आज येथे होणार आहे. तर पुढील दोन दिवस “इथे ओशाळला मृत्यू” आणि “नरसिंह शिवराय” हे नाट्य प्रयोग करण्यात येणार आहेत.