
सावंतवाडी : शहरातील मिलाग्रीस हायस्कूल येथे बुधवारी जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून प्रशालेत कार्यरत असणाऱ्या सर्व महिला कर्मचाऱ्यांचा प्रशालेच्या वतीने गुलाब पुष्प व शुभेच्छापत्र देऊन सन्मान करण्यात आला. तसेच महिलादिनाप्रीत्यर्थ विविध कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले.
या कार्यक्रमाप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदान्हा यांनी स्त्रियांच्या समाजातील एकूणच योगदानाबाबत गौरवोद्गार काढले. महिलांच्या आजच्या प्रगतीचा वाढता आलेखाबाबत त्यांनी स्तुतिसुमने उधळली. तसेच उपस्थित सर्वांनाच महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. प्रशालेतील विद्यार्थिनी प्रतिनिधींचाही मुख्याध्यापकांच्या हस्ते गुलाब पुष्प व शुभेच्छापत्र देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेचे शिक्षक दत्ताराम नाईक यांनी केले तसेच आभार प्रदर्शन विजय इळकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी सिस्टर मेबेल कार्व्हालो, सुपरवायझर मेघना राऊळ यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.