मध्यान भोजन धान्याचा अपहार | मुख्याध्यापकाविरोधात गुन्हा दाखल

Edited by:
Published on: September 18, 2023 18:21 PM
views 1333  views

कुडाळ : विद्यार्थ्यांना प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत शासनाने पुरवलेला मध्यान भोजन धान्याचा अपहार करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी कुडाळ येथील बॅ. नाथ पै माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक महादेव सातपुते यांच्याविरुद्ध कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत तक्रार गटशिक्षणाधिकारी संदेश किंजवडेकर यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात दिली आहे.

याबाबत घडलेली घटना आहे की, कुडाळ येथील बॅ. नाथ पै माध्यमिक विद्यालय या शाळेचे मुख्याध्यापक महादेव सातपुते यांनी पहिली ते आठवी मधील विद्यार्थ्यांना प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना या योजनेमार्फत शासनाने पुरविलेला मध्यान भोजनाचा धान्यापैकी तांदळाची ५० किलोची २१ पोती व १० किलोचे १ पोते, हिरव्या वाटण्याची ५० किलोचे १ पोते, चण्याचे ३० किलोचे १ आणि ५० किलोची २ पोती असे मिळून ५२ हजार २२० रुपयांचे धान्य परस्पर विक्री करण्याच्या उद्देशाने बॅ. नाथ पै विद्यालय येथे बोलोरो टेम्पोमध्ये भरून शालेय पोषण आहाराच्या धान्याचा अपहार करून शासनाची फसवणूक केल्याची तक्रार गटशिक्षणाधिकारी संदेश किंजवडेकर यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात दिली या तक्रारीवरून मुख्याध्यापक महादेव सातपुते यांच्या विरुद्ध भादवि कलम ४१७, ४२०, ४०६, ४०९ अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ चे कलम ३, ७ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे करीत आहे या घटनेबाबत कुडाळ येथील वैभव जाधव व संग्राम सावंत यांनी पोलिसांसह शिक्षणाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले होते.