साथ देणाऱ्याचा केसरकर करतात घात !

नितेश राणेंनाच पाडतील : मायकल डिसोझा
Edited by: विनायक गांवस
Published on: March 13, 2023 12:37 PM
views 162  views

सावंतवाडी : दीपक केसरकर यांना ज्यांनी ज्यांनी साथ दिली त्यांना संपवण्याचे काम दीपक केसरकर यांनी केले आहे. त्यामुळे नक्कीच भविष्यात नितेश राणे यांची देखील उतरता काळ लागेल व नूतन जिल्हा प्रमुख सतीश सावंत आमदार होतील, असा टोला मायकल डिसोजा यांनी लगावला. काल आमदार नितेश राणे यांनी कणकवली येथे दीपक केसरकर यांना निवडून आणावे लागेल असे वक्तव्य केले होते याला मायकल डिसोजा यांनी प्रतिउत्तर दिले आहे.

    

पुढे बोलताना डिसोजा यांनी, पोपटाचा जीव कशात आहे ? याची दीपक केसरकर नेहमी कथा सांगायचे. पण खरे तर केसरकर यांचा जीव मंत्रिपदात आहे. त्यांना शिक्षणमंत्री करण्याऐवजी पर्यटनमंत्री करणे आवश्यक होते. कारण मतदारसंघ वाऱ्यावर सोडून हे फक्त पर्यटनासाठी सिंधुदुर्गात येतात. बेताल वक्तव्य करून निघून जातात. यांनी जर कार्यकर्ते घडविले असते. पक्षासाठी काम केले असते तर सावंतवाडी नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती यांच्या ताब्यात असली असती. यांनी कार्यकर्ते घडविण्याचे नाही तर कार्यकर्ते संपविण्याचे काम केले. नूतन जिल्हा प्रमुख सतीश सावंत यांचे मी अभिनंदन करतो. कारण भविष्यात ते आमदार होतील. नितेश राणे यांनी केसरकर यांना निवडून आणण्याचे वक्तव्य केले आहे. इतिहास पाहता केसरकर यांना मदत करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्यांनी संपविले आहे. त्यामुळे नितेश राणे यांचा उतरता काळ सुरू होणार आहे. आपण मोठे होण्यासाठी ते नेहमी दुसऱ्याला संपविण्याचे करेक्ट काम करतात. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना त्रास देण्याचे काम त्यांनी केले. भविष्यात त्यांचे अनामत रक्कम जमा होईल, असा विश्वास मायकल डीसोजा यांनी व्यक्त केला आहे. मागच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांकडून पैसे घेवून केसरकर निवडून आले. तेच केसरकर उद्धव ठाकरे यांना पैसे दिल्याचे सांगत आहेत. हे हास्यास्पद असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले. तसेच बेताल वक्तव्य करण्यापेक्षा दिलेली आश्वासने त्यांनी पूर्ण करावी. केसरकर हे मनोरंजनाचे साधन बनले आहेत. भविष्यात त्यांच्यावर आमचा शाखा प्रमुख सुद्धा टीका करेल असेही डिसोजा म्हणाले.