
सावर्डे : कलेचा प्रवास हा संवेदनशीलतेकडून सृजनात्मतेकडे होत असतो. जे दिसते, जे भावते ते विविध रंगछटांच्या माध्यमातून समाजासमोर ठेवणे हा कलात्मक दृष्टिकोन असणाऱ्या व्यक्तीकडून अविरत घडत असते. ग्रामीण लोकजीवन लहानपणापासूनच न्याहाळत आलेले सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे पर्यवेक्षक उद्धव तोडकर यांनी सुविचार व फोटोग्राफीच्या माध्यमातून वैयक्तिक व सामाजिक स्वच्छतेविषयीची राबवलेल्या उपक्रम विद्यार्थ्यांच्या मध्ये जाणीव निर्माण करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरला आहे.
गेली पाच वर्ष नियमितपणे निसर्गातील विविध रंगछटांचा उपयोग करून घेऊन त्या रंगछटांना तेवढाच नैतिक मूल्यावर आधारित सुविचाराची जोड देऊन विद्यार्थ्यांना वैयक्तिक व सामाजिक स्वच्छते विषयी माहिती देण्याचे काम केले जात आहे. कलात्मक दृष्टिकोनाने निर्माण केलेली ही फोटोग्राफी विद्यार्थ्यांना आकर्षित करून घेते व स्वच्छतेचा संदेश विद्यार्थ्यांचे पर्यंत पोहोचण्यास पूरक ठरते. नियमितपणे या सुविचारांचा अर्थ व त्या फोटोग्राफीमध्ये दडलेली नैसर्गिक शक्तीचे स्पष्टीकरण विद्यार्थ्यांना दिले जाते. अंतर्मनात दडलेला एखादा विचार अतिशय मार्मिकपणे चित्ररूपाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या समोर ठेवल्यामुळे हा उपक्रम विद्यार्थ्यांना प्रिय ठरला आहे. विद्यार्थ्यांना आवडलेले एखाद्या चित्र आणि त्यातील स्वच्छतेचा संदेश घराघरापर्यंत पोचण्यासाठी व विद्यार्थ्यांच्या मनात स्वच्छतेचे महत्व दृढ होण्यासाठी हा उपक्रम पूरक आहे. पर्यवेक्षक उद्धव तोडकर यांनी गेली पाच वर्ष अविरतपणे राबवलेल्या उपक्रमाबद्दल विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे उपप्रचार्य चव्हाण सर्व शिक्षक,विद्यार्थी व कला प्रेमींनी उद्धव तोडकर यांची कौतुक केले आहे.