
सावंतवाडी : तालुक्यातील रेवीचे भाटले, कुणकेरी येथे राहणाऱ्या एका ३५ वर्षीय महिलेचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज दुपारी उघडकीस आली. त्या गेल्या दोन वर्षांपासून मानसिक आजाराने त्रस्त होत्या आणि त्यांच्यावर गोवा बांबुळी येथील मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरु होते.
मिळालेल्या माहितीनुसार, काल, शुक्रवारी सायंकाळी त्या आपल्या माहेरी आल्या होत्या. आज सकाळी दहा वाजताच्या सुमारास त्या घरातून बाहेर पडल्या. बराच वेळ होऊनही त्या घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी त्यांची शोधाशोध सुरु केली. दुपारच्या सुमारास, त्यांच्याच भातशेतीच्या बाजूला असलेल्या कठडा नसलेल्या विहिरीत त्या उताणे अवस्थेत पाण्यात तरंगताना आढळून आल्या.
या घटनेची माहिती मिळताच, स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या मानसिक आजाराने ग्रासलेल्या होत्या. त्यांच्या पश्चात पती आणि दोन मुले आहेत. त्यांच्या मुलांपैकी एक मुलगा १० वीत शिकत असून, मुलगी तिसरीत आहे. या घटनेबद्दल बोलताना पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी सांगितले की, " महिलेचा आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून, पुढील कायदेशीर कार्यवाही सुरु आहे."