
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलमध्ये प्रशालेतील दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी 'कुमारवयीन अवस्थेमध्ये होणारे मानसिक ,भावनिक बदल' या विषयावर सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉ. रुपेश पाटकर यांचे समुपदेशन सत्र आयोजित करण्यात आले होते.
यावेळी सारासार विचार करणे, स्वतःच्या क्षमतांचा शोध घेऊन क्षमता ओळखणे व सरावाने कौशल्य विकसित करणे, स्वमर्यादांची जाणीव करून घेणे, परस्परांना आदर देऊन सुसंवाद साधणे, स्वतःच्या भावना ओळखता येणे तसेच भावना हाताळता येणे, योग्य त्या कृतींना प्रतिसाद देणे, नैतिकदृष्ट्या योग्य तत्वावर ठाम राहणे, कुसंगतीपासून दूर राहणे, व्यक्ती स्वभाव ओळखण्यास शिकणे, भावनिक व बौद्धिकदृष्ट्या सक्षम होऊन मानसिक आरोग्य जपणे, समतोल सुसंवाद साधण्याचे कौशल्य वृद्धिंगत करणे , सामाजिक भान राखणे, सोशल मीडियावर होणाऱ्या फसवणुकीपासून सावधान राहणे, भूलथापांना बळी न पडणे व दक्षता बाळगणे यासंदर्भात डॉक्टर रुपेश पाटकर यांनी विविध उदाहरणे व अनुभवांद्वारे विद्यार्थ्यांचे समुपदेशन केले. प्रशालेतर्फे मुख्याध्यापिका श्रीमती.अनुजा साळगांवकर यांनी स्नेहभेट देऊन डॉक्टर रुपेश पाटकर यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी प्रशालेचे विद्यार्थी तसेच सर्व शिक्षक समुपदेशनासाठी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक, स्वागत व आभारप्रदर्शन श्रीम. इंतिझिया फर्नांडिस यांनी केले.
या कार्यक्रमासाठी सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीमंत राजेसाहेब खेमसावंत भोंसले, चेअरमन श्रीमंत राणीसाहेब शुभदादेवी खेमसावंत भोंसले, कार्यकारी विश्वस्त श्रीमंत लखमराजे भोंसले , विश्वस्त युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले व मंडळाचे संचालक दिलीप देसाई, मंडळाचे सहाय्यक संचालक ॲड. शामराव सावंत, मंडळाचे सदस्य जयप्रकाश सावंत, डॉ.सतीश सावंत, मुख्याध्यापिका अनुजा साळगावकर तसेच प्रशालेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक शिक्षक संघ कार्यकारी समितीचे सदस्य यांनी शुभेच्छा दिल्या.











