
रत्नागिरी : छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक राष्ट्रीय दर्जाचे व ऐतिहासिक स्मारक होईल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.भव्य दिव्य होईल याकरिता पुरातत्त्व व बांधकाम विभागाने अजून अन्य मोठ-मोठ्या ठिकाणी असलेल्या प्रकल्पाचा अभ्यास करा आणि अजून भव्यता कशी आणता येईल हे पहा, अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.
कर्णेश्वर मंदिर, कसबा, संगमेश्वर येथे उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी छत्रपती संभाजी स्मारक जतन, सर्वधन आणि परिसर विकास अनुषंगाने बैठकीत आढावा घेतला. त्याप्रसंगी ते बोलत होते. या वेळी यावेळी पालकमंत्री डॉ. उदय सांमत, महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे, आमदार भास्कर जाधव, आमदार शेखर निकम, माजी आमदार सुभाष बने, माजी आमदार प्रमोद जठार, माजी जि.प. अध्यक्ष विक्रांत जाधव, माजी जि.प. अध्यक्ष रोहन बने, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, पुरातत्व विभागाचे स्थापत्य अभियंता इंद्रजीत नागेश्वर अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
प्रथम उपमुख्यमंत्री श्री पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. यानंतर छत्रपती संभाजी महाराज स्मारक परिसराची आणि येथील सरदेसाई वाड्याची पहाणी करण्यात आली. यावेळी म्युझियम, ब्रिज कम बंधारा, व्हीगॅलरी, येथील नदीला येणारे पाणी, जुन्या मंदिरांचे जतन आदी विषयांवर अर्कीटेक्चर बरोबर चर्चा केली.
उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी पाहणी झाल्यानंतर कर्णेश्वर मंदिरात दर्शन घेतले आणि छत्रपती संभाजी स्मारक जतन, संर्वधन आणि परिसर विकास बैठकीत आढावा घेतला. बैठकीच्या सुरुवातीला पहलगाम, काश्मीर येथे दहशतवादी हल्ल्यात मरण पावलेल्या पर्यटकांना श्रध्दाजंली अर्पण करण्यात आली. छत्रपती संभाजी महाराज स्मारक जतन, संर्वधन आणि परिसर विकासच्या अनुषंगाने पुरातत्व विभागाचे स्थापत्य अभियंता इंद्रजीत नागेश्वर यांनी सादरीकरण केले.
सादरीकरण पाहिल्यानंतर बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी आवश्यक त्या सूचना केल्या. ते पुढे म्हणाले आपल्याला सर्वांना सोबत घेऊन हा प्रकल्प पुढे न्यायचा आहे. स्थानिकांच्या भावना जराही दुखावणार नाहीत याची काळजी घेऊन त्यांच्या सहमतीने आपल्याला स्मारक उभे करायचे आहे. ज्याची जागा जाईल, त्यांना योग्य तो मोबदला देऊ. स्मारक भव्य दिव्य होईल याकरिता पुरातत्त्व व बांधकाम विभागाने अजून अन्य मोठमोठ्या ठिकाणी असलेल्या प्रकल्पाचा अभ्यास करा आणि अजून भव्यता कशी आणता येईल हे पहा. हे सांगताना त्यांनी पिंपरी चिंचवड येथील शेखर सिंग या अभियंत्यांशी फोनद्वारे संभाषण साधले.
कर्णेश्वर हे प्राचीन मंदिर आहे. या मंदिराचे काम अजही उत्तम दर्जाचे आहे. मंदिरांचे पावित्र टिकविले पाहिजे. महाराजांच्या स्मारकाच्या पाच एकर क्षेत्रामधील नदीच्या काठावरील मंदिरांचेही जतन केले जाणार आहे. छत्रपती संभाजी महाराज स्मारकाच्या माध्यमातून भरघोस निधी देऊ. राष्ट्रीय पातळीचे स्मारक करताना हेरिटेज टच देऊन येथील हवामानाला प्रुफ असेल असे टिकाऊ बनवूया. स्थानिक पातळीवरील नकाशे, अन्य बाबी लवकरात लवकर पूर्ण करून मला माहिती द्या. ३० जूनला पावसाळी अधिवेशन होत आहे. यात स्मारकासाठीच्या निधीला मंजुरी द्यायची आहे, असेही स्पष्ट केले. छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक हे राष्ट्रीय दर्जाचे व ऐतिहासिक स्मारक होईल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. येत्या अधिवेशनात स्मारक व परिसर विकास प्रकल्पाच्या निधीला मंजुरी घेऊ. या वेळी पालकमंत्री डॉ. उदय सामंत, महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे, आमदार भास्कर जाधव आणि आमदार शेखर निकम यांनी आपले मनोगत व्यक्त केले.