सावंतवाडी 'अर्बन'मधील सभासद - ठेवीदारांचा केसरकरांकडून विश्वासघात : अर्चना घारे - परब

Edited by: विनायक गावस
Published on: June 16, 2023 11:57 AM
views 223  views

सावंतवाडी : सावंतवाडी अर्बन बँकेवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने निर्बंध लादले आहेत. नुकतेच याबाबतचे पत्र बँकेस व माध्यमांना प्राप्त झाले आहे. आम्ही शालेय, महाविद्यालयीन जीवनात असताना बँक उर्जितावस्थेत होती. त्या काळातील संचालकांनी अतिशय उत्तम प्रकारे कारभार करून बँकेला नावारूपाला आणले होते. सावंतवाडीतील अनेक व्यापाऱ्यांना बॅंकेने कर्ज स्वरुपात मदत करून व्यवसायास हातभार लावला होता. व्यापाऱ्यांनी देखील अत्यंत सचोटीने व्यवसायास करून प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड करत बँकेच्या प्रगतीस मदत केली होती. सभासद, ठेवीदार आणि बँक यांचे एक विश्वासाचे नाते तयार झाले होते. 

सावंतवाडी अर्बन बँकेच्या सभासद ठेवीदारांनी या पूर्वीच्या काळात अत्यंत सचोटीने, प्रामाणिकपणे, शिस्तबद्ध आणि आर्थिक नियोजनाने वाढवलेली ही संस्था होती. परंतू जुनी मंडळी गेली. सभासदांची दिशाभूल करुन एक चांगली संस्था दीपक केसरकर यांनी ताब्यात घेतली आणि त्यांच्या हस्तक्षेपानंतर डबघाईस येत बँकेला उतरती कळा लागली. 


आज बँकेवर निर्बंध आहेत. अनेक वर्षे सभासदांना लाभांश मिळत नाही. मोठ्या विश्वासाने बँकेचे सभासदांनी बँकेची धुरा केसरकर यांच्या हातात दिली. त्यांनी ही संस्था लवकरच उर्जितावस्थेत आणतो असे आश्वासन दिले होते. नेहमीप्रमाणे हे आश्वासन देखील पोकळ निघाले. हवेत विरले आहे. सभासद, ठेवीदारांचा मोठा विश्वासघात केला आहे. 


रिझर्व्ह बँकेने दिलेल्या नोटीस प्रमाणे संस्थेला पुन्हा उर्जीतावस्थेत आणण्यासाठी येत्या काळात तरी त्यांनी तश्या प्रकारचे प्रयत्न करत बँकेला पुन्हा गतवैभव प्राप्त करून द्यावे. कारण बँकेच्या लयास कारणीभूत असलेले केसरकर आज मोठ्या पदावर आहेत. त्यांच्या महाशक्तीचे त्यांना गल्ली पासून दिल्लीपर्यंत पाठबळ आहे. महाशक्तीच्या सहाय्याने बँकेला पुन्हा उर्जितावस्था प्राप्त करून द्यावी असे आवाहन अर्चना घारे यांनी केले आहे.