मेघनाद धुरी यांचं उपोषण स्थगित !

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: January 17, 2024 11:40 AM
views 237  views

मालवण : क्यार व महा चक्रीवादळातील नुकसानग्रस्त मच्छिमारांना राज्य शासनाने मंजूर केलेले विशेष आर्थिक साहाय्य तीन वर्षे झाली तरी मत्स्य व्यवसाय विभागाकडून लाभार्थी मच्छिमारांना वाटप करण्यात आलेले नसल्याने याबाबत आज सिंधुदुर्ग जिल्हा मच्छिमार सहकारी संस्था फेडरेशनचे अध्यक्ष मेघनाद धुरी यांनी मालवण येथील सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त कार्यालयासमोर उपोषण छेडले. यावेळी मत्स्य व्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री. अलगिरी यांनी १५ फेब्रुवारी पर्यंत लाभार्थी मच्छिमारांना मदतीची रक्कम दिली जाईल, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर धुरी यांनी उपोषण स्थगित केले. मात्र १५ फेब्रुवारी पर्यंत मच्छिमारांना मदत न मिळाल्यास १६ फेब्रुवारी पासून पुन्हा उपोषणास बसू, असा इशारा धुरी यांनी दिला.


मेघनाद धुरी यांनी आज सकाळपासून मालवण येथील सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त कार्यालयासमोर उपोषण छेडले. यावेळी जॉन नरोना, जगदीश खराडे, संतोष खांदारे, विकी चोपडेकर, जेम्स फर्नांडिस, प्रवीण निवतकर, योगेश मायबा, कमालकांत मायबा, दुमिंग फर्नांडिस, शैलेश मोंडकर आदी व इतर मच्छिमार उपस्थित होते. 


राज्यातील सागरी मच्छिमारांना क्यार व महा चक्रीवादळांमूळे पूर्ण क्षमतेने मासेमारी करता आली नसल्याने राज्यसरकारने विशेष आर्थिक सहाय्य मंजूर केले होते. वादळानंतर राज्य शासनाने मच्छिमारांना मंजूर केलेले विशेष आर्थिक साहाय्य तीन वर्षे झाली तरी मत्स्य व्यवसाय विभागाकडून लाभार्थी मच्छिमारांना वाटप करण्यात आलेले नाही.  ६३,६०,०००/- रु. एवढी मदतीची रक्कम अद्याप मच्छिमारांना देण्यात आलेली नसून हा मच्छिमार सहकारी संस्थांच्या सभासदांवर एक प्रकारचा अन्याय झालेला आहे. मदत देण्यास दिरंगाई होत असल्याने मत्स्य विभागाच्या मनमानी कारभारा विरोधात आपण उपोषण छेडल्याचे यावेळी मेघनाद धुरी यांनी सांगितले.


दुपारी मत्स्य व्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री. अलगिरी यांनी धुरी यांच्या मागणीनुसार कार्यवाही सुरु असून १५ फेब्रुवारी पर्यंत लाभार्थी मच्छिमारांच्या बँक खात्यावर मदतीची रक्कम जमा करण्यात येईल असे लेखी आश्वासन देत तसे पत्र धुरी यांना सुपूर्द केले. या आश्वासनामुळे धुरी यांनी उपोषण स्थगित केले.