LIVE UPDATES

देवगडमध्ये महास्वच्छता मोहिम

Edited by: नागेश दुखंडे
Published on: May 28, 2026 19:10 PM
views 32  views

देवगड : जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग तसेच पंचायत समिती देवगड यांच्या मार्गदर्शनाखाली देवगड तालुक्यात ४ जून २०२६ रोजी विशेष महाश्रमदान स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले असून तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये एकाच दिवशी व एकाच वेळी ही मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत ग्रामस्थ, विद्यार्थी, महिला बचत गट, युवक मंडळे तसेच विविध शासकीय विभागांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन गटविकास अधिकारी अरूण चव्हाण यांनी केले आहे.

तालुक्यात ग्रामीण स्वच्छतेचे प्रमाण वाढवणे, गावांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण करणे तसेच स्वच्छतेची लोकचळवळ उभारणे हा या मोहिमेमागील मुख्य उद्देश असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. स्वच्छ आणि निरोगी गावांची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.

महास्वच्छता मोहीम ४ जून रोजी सकाळी ७ ते ९ या वेळेत तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत क्षेत्रात एकाच वेळी राबविण्यात येणार आहे. या मोहिमेमध्ये ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील शाळा, अंगणवाड्या, शासकीय कार्यालये, मंदिरे, बाजारपेठा, सार्वजनिक रस्ते तसेच कचरा साचणारी ठिकाणे स्वच्छ करण्यात येणार आहेत. तसेच प्लास्टिक कचरा निर्मूलन,  परिसर स्वच्छता आणि नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जागृती करण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे.

या मोहिमेमुळे ग्रामीण भागात स्वच्छतेबाबत सकारात्मक वातावरण निर्माण होऊन “स्वच्छ गाव – सुंदर गाव” ही संकल्पना अधिक प्रभावीपणे रुजण्यास मदत होणार असल्याचा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.