बौद्धवाड्यांतील स्मशानभूमी प्रश्नावर आमदार निकमांच्या पुढाकाराने बैठक

लवकरच तोडगा निघणार
Edited by: मनोज पवार
Published on: August 03, 2025 13:13 PM
views 127  views

चिपळूण : शहरातील पेठमाप बौद्धवाडी, गोवळकोट बौद्धवाडी, तारा बौद्धवाडी, सुबा बौद्धवाडी आणि कदम बौद्धवाडी या पाच बौद्ध वाड्यांतील नागरिकांनी स्मशानभूमीच्या गैरसोयीविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत १५ ऑगस्टपासून अन्न-पाण्याचा त्याग करण्याचा इशारा नगरपालिकेला नोटीस देऊन दिला होता. याची बातमी वर्तमानपत्रांत प्रसिद्ध होताच चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांनी तातडीने दखल घेत महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना घेऊन पाचही वाड्यांच्या पंच प्रमुख आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांसह सविस्तर बैठक घेतली.

ही बैठक अत्यंत खेळीमेळीत आणि कौटुंबिक वातावरणात पार पडली. या वेळी स्मशानभूमीच्या अभावामुळे मृतदेहांवर अंत्यसंस्कार करताना येणाऱ्या अडचणी, मूलभूत नागरी सुविधांचा अभाव, अंत्यविधीच्या जागेचा प्रश्न आणि यामागे असलेली सामाजिक भावनांची जाणीव नागरिकांनी अत्यंत स्पष्टपणे मांडली. सर्वांच्या भावना समजून घेत आमदार शेखर निकम यांनी या मागण्या न्याय्य असून त्या तातडीने पूर्ण करण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांशी समन्वय साधून आवश्यक ती पावले उचलण्याचे आश्वासन दिले.

या बैठकीत नागरिकांनी दिलखुलासपणे आपल्या अडचणी मांडल्या. आमदारांनीही अत्यंत संवेदनशीलतेने त्यांची बाजू समजून घेतली. स्मशानभूमीच्या मागणीकडे केवळ नागरी सुविधेचा भाग म्हणून न पाहता ती सामाजिक न्याय आणि सन्मानाचा मुद्दा आहे, असे मत आमदारांनी स्पष्टपणे मांडले. त्यामुळे या मागणीकडे गांभीर्याने पाहत त्यावर तातडीने कार्यवाही केली जाणार आहे.

आमदार निधी, नगरपालिका प्रशासन, जिल्हाधिकारी कार्यालय, तसेच आवश्यक त्या ठिकाणी पालकमंत्री यांच्या स्तरावरून या मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही आमदार निकम यांनी बैठकीत जाहीर केले. सोमवारी या विषयावर महायुती पदाधिकारी, पंचप्रमुख, वाड्यांचे प्रतिनिधी आणि नगरपालिका मुख्याधिकारी यांच्यात प्रत्यक्ष बैठक होणार असून या वेळी अंमलबजावणीसाठी ठोस निर्णय होण्याची शक्यता आहे.

या बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष मिलिंद कापडी, शिवसेना शहरप्रमुख उमेश सकपाळ, भाजप शहराध्यक्ष शशिकांत मोदी, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष व महायुती समन्वयक उदय ओतारी, आर.पी.आय. तालुकाध्यक्ष प्रशांत मोहिते, सोशल मिडिया जिल्हाध्यक्ष सचिन साडविलकर, नगरसेविका स्वाती दांडेकर, माजी नगरसेवक विजय चितळे, मनोज जाधव, भाजप ज्येष्ठ नेते साईनाथ कपडेकर, मागासवर्गीय तालुकाध्यक्ष विशाल जानवलकर, अर्बन बँक डायरेक्टर समीर जानवलकर, खाजगी सचिव राज कदम, आर.पी.आय. पदाधिकारी उमेश सकपाळ, अमोल कदम, संदेश कदम, राष्ट्रवादी पदाधिकारी सुयोग चौधरी, संकेत कपडेकर, आल्हाद यादव, अनिकेत ओतारी, जयराज भागवत तसेच पाच वाड्यांतील पंच प्रमुख व प्रतिनिधी सचिन कदम, उल्हास कदम, अरुण कदम, राजेश कदम, विजय कदम, नयन कदम, दिलीप मोहिते, सुशील सकपाळ, वैभव सकपाळ, अनंत पवार, दिलीप कदम हे उपस्थित होते.

या बैठकीत उपस्थित सर्वांनी सकारात्मक भूमिका घेत स्मशानभूमीसह अन्य नागरी सुविधांबाबत एकत्रितपणे उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे मान्य केले. पाचही वाड्यांचे प्रतिनिधी, महायुतीचे पदाधिकारी आणि आमदार यांच्यात एकजूट दिसून आली. त्यामुळे यापुढे सामाजिक भेद न ठेवता विकास आणि सन्मानाच्या दृष्टीने या मागण्यांवर निर्णायक तोडगा निघेल, अशी अपेक्षा आहे.

या चर्चेच्या पार्श्वभूमीवर बौद्ध समाजातील नागरिकांमध्ये समाधानाची भावना दिसून आली असून प्रशासनाने या मागण्यांकडे गांभीर्याने पाहून योग्य निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आंदोलनाचा इशारा दिल्यानंतरही शांततेच्या मार्गाने संवाद साधून तोडगा काढण्याचा हा प्रयत्न प्रशंसनीय असल्याचे अनेकांनी म्हटले आहे.