
वेंगुर्ला: सावंतवाडी-वेंगुर्ला -दोडामार्ग विधानसभा मतदार संघातील विजेच्या गंभीर समस्यांबाबत या भागाचे आमदार दीपक केसरकर यांनी ऊर्जा मंत्रालयाच्या राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधले होते. याची दखल घेत मुंबई मंत्रालय येथे अधिवेशन काळात मतदार संघातील विजेच्या विविध समस्यांवर व प्रश्नांवर तोडगा काढण्याच्या दृष्टीने बैठक घेण्यात आली. या बैठकीत विविध तांत्रिक अडचणी, खंडित वीजपुरवठा, वितरण व्यवस्था आणि नागरिकांच्या तक्रारी तसेच सर्व मोठ्या शहरातील विद्युत वाहिन्या भूमिगत करण्या संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. यावर योग्य त्या उपाययोजना राबवण्यासाठी स्पष्ट निर्देश राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्याकडून देण्यात आल्याची माहिती आमदार दीपक केसरकर यांनी दिली.
या बैठकीवेळी ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, गृहराज्यमंत्री योगेश कदम, आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे, आमदार महेंद्र दळवी, आमदार शेखर निकम, प्रशांत ठाकूर, रवीशेठ पाटील, ऊर्जा विभागाचे सचिव लोकेशचंद्र तसेच ऊर्जा विभागाचे अधिकारी वर्ग, शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, स्वीय सहाय्यक योगेश तेली उपस्थित होते.
यावेळी सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील दोडामार्ग तालुक्यातुन विजेची हायटेंशन लाईन गेलेली आहे. शासनाच्या धोरणानुसार त्या लाईनला टेंपींग देता येत नाही. त्यामुळे या भागातील अनेक उद्योगधंदे वीज पुरवठयापासून वंचीत राहीले आहेत. येथील परिस्थिती विचारात घेता याठिकाणी टेंपींग यंत्रणा उभी करण्यात यावी. तसेच दोडामार्ग तालुक्या डोंगराळ व दुर्गम भागामध्ये बऱ्याच वेळा विज पुरवठा वारंबार खंडीत होत असतो त्यामुळे येथील नागरीकांना १ ते २ आठवडे वीजेपासून वंचीत राहावे लागते. त्यामुळे वझरे येथील शासकीय जागेत शासनाच्या RDSS योजने अंतर्गत शासनाकडे प्रस्तावित असलेल्या स्वतंत्र विद्युत सब स्टेशनला मंजुरी मिळावी.
दोडामार्ग तालुक्यातील तिलारी धरण प्रकल्प क्षेत्रालगत होत असलेल्या अम्युझमेंट पार्क प्रकल्पाकरीता स्वतंत्र ट्रान्सफॉमर किंवा सबस्टेशन करावे. तसेच तिलारी धारण प्रकल्पावर महालक्ष्मी विद्युत प्राईवेट लिमीटड कंपनी ही दोडामार्ग तालुक्यासाठी विद्युत पुरवठा गेली बरीच वर्षे करीत आहे. गेल्या एक वर्षा पुर्वी सदरच्या कराराची मुदत संपल्याने या कंपनी कडून दोडामार्ग तालुक्याचा विद्युत पुरवठा बंद आहे. त्यामुळे या भागा मध्ये विजेची कमतरता भासत आहे. पुनःश्य करार करण्यासाठी प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आलेला असून याचा तात्काळ विचार व्हावा.
सांवतवाडी शहरासाठी भूमीगत विद्युतवाहीनी (केबल) टाकण्याचे रद्द झालेले काम पुन्हा मंजूर होणेसाठी आवश्यक कार्यवाही करावी. तसेच मतदार संघातील बहुतांशी भाग हा दुर्गम व डोंगराळ असल्याने याठिकाणी ३३ केव्ही वाहिन्या या भूमीगत केल्यास विद्युत पुरवठा खंडीत होण्याचे प्रमाण शून्य टक्के वर येईल. वेंगुर्ला तालुक्यातील किनारपट्टी भागातील वीज प्रश्न लक्षात घेता चिपी विमानतळ येथे मंजूर असलेले उपकेंद्र तात्काळ कार्यान्वित व्हावे. सिंधुदुर्ग जिल्हयामध्ये वारंवार चक्रीवादळ किंवा अन्य नैसर्गिक आपत्तीमुळे वीजेचे खांब पडून वीज पुरवठा खंडीत होत असतो. त्यासाठी नव्याने वीजेचे खांब उभारण्याचे काम मंजूर करण्यात आले होते. याबाबत तात्काळ विचार व्हावा.
सावंतवाडी ईन्सुली ते दोडामार्ग महालक्ष्मी विद्युत प्रा. लि. कंपनी पर्यंत नविन लाईन टाकणे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढत्या पर्यटनाचा विचार करता सिंधुरत्न योजने अंतर्गत पर्यटनवाढसाठी टेंड/कॉटेनीस/तत्सम निवासी संकुले (बंगलो सिस्टिम) ही योजना राबविण्यात येत असून सदर योजना ही जिल्ह्यातील प्रत्येक घरासाठो राबविता यावी या अनुषंगाने याला व्यावसायीक दराने विजपुरवठा न आकारता घरगुती दराने विजपुरवठा करावा आदी विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली.