
वेंगुर्ले : सैनिक व पोलीस यांच्या पत्नी, मातांसाठी आयोजित ‘तो देशासाठी, मी घरासाठी-पण आम्ही दोघंही देशभक्त‘ यावर घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेत ठाणे येथील मिनाक्षी गांवकर यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.
वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस आणि कै.गणेश लक्ष्मण दाभोलकर मेस्त्री सांस्कृतिक मंच, दाभोली यांच्या संयुक्त विद्यमाने घेतलेल्या या स्पर्धेत राज्यभरातून २७ निबंध प्राप्त झाले होते. द्वितीय-अंजली सावंत (देवसू), तृतीय-सुषमा वालावलकर (मळगांव) यांनी मनाली राऊत (सावंतवाडी) आणि प्रज्ञा पालकर (वेंगुर्ला) यांनी उत्तेजनार्थ क्रमांक पटकाविले.
निबंधांचे परीक्षण डॉ.सचिन परूळकर यांनी केले. सर्व विजेत्या स्पर्धकांचे वेताळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक तिरोडकर आणि आंतरराष्ट्रीय पंच व क्रीडा संस्कृती प्रचारक अशोक दाभोलकर-मेस्त्री यांनी अभिनंदन केले आहे. विजेत्यांना प्रतिष्ठानच्या आगामी महोत्सवात गौरविण्यात येणार आहे.