
दोडामार्ग : तिलारीचे धरणाचे पाणी मेढे, पाळये, सोनावल, मोर्ले, केर या ५ गावांना देण्याचा मुद्दा जनता दरबारमध्ये आज मांडण्यात आला. यावेळी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी तात्काळ याची दखल घेत तिलारी जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता विनायक जाधव यांच्या समक्ष सदर पाणी कसे देता येईल याचा ढोबळ नकाशा काढून घेत विषय समजून घेतला. आणि त्याबाबतच्या सूचना त्यांज संबंधित अधिकाऱ्यांना देत तातडीने सर्व्हे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यावेळी मंत्री चव्हाण यांच्यासोबत माजी आमदार राजन तेली, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत आदी उपस्थित होते.
यावेळी सरपंच संघटना जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस, भाजपा उपजिल्हाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, दोडामार्ग तालुकाध्यक्ष सुधीर दळवी, कसई - दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण, माजी नगराध्यक्ष संतोष नानचे, केर - भेकुर्ली ग्रामपंचायत उपसरपंच तेजस देसाई, आदींसह मेढे, पाळये, सोनावल, मोर्ले, केर या ५ गावातील ग्रामस्थांनी तिलारी धरणाचे पाणी मिळावे अशी मागणी जनता दरबारात पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचेकडे केली होती .