
वेंगुर्ला : ब-याच बागांमध्ये आंबा फळ काढणी सुरू आहे. दरम्यान, या आठवड्यात हवामान काही प्रमाणात ढगाळ राहिले आहे. तसेच काही ठिकाणी पाऊस पडत असून येत्या दोन ते तीन दिवसांत पावसाची शक्यता आहे. अशा परिस्थितीत आंबा पिकावर करपा रोगाचा व फळ माशीचा प्रादूर्भाव संभवतो. म्हणूनच अवकाळी पावसात आंबा पिकाचे संरक्षण करण्यासाठी वेंगुर्ला येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्रातर्फे उपाय सुचविले आहेत.
पावसामुळे फळांवर करपा रोगाचे काळे डाग पडतात. अशावेळी फळांवर बुरशीनाशकांची फवारणी करणे आवश्यक आहे. बुरशीनाशकांची फवारणी न केल्यास काळे डाग वाढत जाऊन फळे पिकताना सडण्याची प्रक्रिया होऊ शकते. जी फळे १५ दिवसानंतर काढायची आहेत त्या फळांवरील करपा रोगाचा प्रतिबंध करण्यासाठी कार्बेन्डॅझिम (१० लिटर पाण्यात १० ग्रॅम) या बुरशीनाशकाची फवारणी करावी व त्यानंतर १५ दिवसांनी त्या फळांची काढणी करावी. तसेच सध्या झाडावर काढणीसाठी फळे असतील तर अशा फळांची व्यवस्थित काढणी करून त्या फळांना उष्णजल प्रक्रिया करावी. त्यासाठी फळे ५२ अंश सेल्सिअस तापमानाच्या पाण्यात १० मिनिटे बुडवून ठेवावीत व त्यानंतर फळे व्यवस्थित सुकवून आडीत घालावीत. त्यामुळे फळे पिकत असताना फळकुज रागांचा प्रादुर्भाव कमी होईल व त्यामुळे होणारे नुकसान टाळता येईल. त्याचप्रमाणे सध्यस्थितीत फळ माशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढू शकतो.
यासाठी शिफारस केलेले रक्षक सापळे प्रति हेक्टरी ४ या प्रमाणात सर्व शेतक-यांनी बागेत लावावेत जेणेकरून फळमाशीचा प्रादुर्भाव नियंत्रणात येईल. तसेच पूर्वी लावलेल्या रक्षक सापळ्यामध्ये ल्युर बदलणे आवश्यक असल्यास बदलून घेणे, अशाप्रकारचा उपाय प्रादेशिक फळ संशोधन केंद्रातर्फे सुचविण्यात आला आहे.