
सिंधुदुर्गनगरी : मान्सून कालावधीत जून ते ऑक्टोबर या कालावधीत साथरोग, अतिवृष्टी नैसर्गिक आपत्ती इत्यादीसाठी जोखमीचा आहे. तरी आरोग्य विभागामार्फत साथरोग टाळण्यासाठी पुढीलप्रमाणे उपाययोजना करण्यात येत आलेली असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांनी दिली आहे.
जिल्हास्तरावर दोन व तालुकास्तरावर एक अशा एकूण 10 वैद्यकीय मदत पथकाची स्थापना करण्यात आलेली आहे. जिल्हास्तरावर व प्राथमिक आरोग्य केंद्रात 24 तास कार्यरत नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. जोखीमग्रस्त गावांची निवड करून यादी तयार करण्यात आलेली आहे. लेप्टोस्पायरोसीस साठी 13 (देवगड- रामेश्वर, कणकवली- हळवल, वागदे, कुडाळ- किनळोस धनगरवाडा, घावनाळे, तेंडोली, रानबांबुळी, धुरीटेंबनगर, वेंगुर्ला- होडावडा, वेतोरे, सावंतवाड़ी- आंबोली, तळवडे परबवाड़ी) व जलजन्य आजारासाठी 3 (वैभववाडी-करुळ, कणकवली -कोळोशी, वेंगुला - कनयाळ गावतळे) गावांची निवड करण्यात आलेली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर औषधसाठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध ठेवण्यात आलेला आहे.
या कालावधीत जिल्ह्यातील जनतेने घ्यावयाची खबरदारी म्हणून खालील सूचनांचे पालन करावे.
आपल्या घरात अगर शेजारी तीव्र ताप, अंगदुखी, थंडी वाजणे तीव्र स्नायू वेदना, लघवी पिवळी होणे अशा लक्षणाचा रुग्ण असल्यास त्वरीत नजिकच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय तसेच जिल्हा रुग्णालय येथे उपचार घेण्यांत यावे. ब्लिचिंग पावडरने निर्जतुक केलेले किंवा उकळून शुध्द केलेलेच पाणी पिण्यासाठी वापरावे. नियमित ताजे व गरम अन्न खावे. शौचाहून आल्यावर व जेवणापूर्वी हात साबणाने स्वच्छ धुवावे. घरातील व घराशेजारील परिसर स्वच्छ राखावा. ज्या व्यक्तींच्या हाता पायांवर जखम किंवा खरचटलेले असल्यास अशा व्यक्तीनी दुषित पाणी, दुषित माती तसेच साचलेले पाणी यांच्याशी संपर्क टाळावा तसे शक्य नसल्यास रबरी बुट व हातमौजे वापरावे. जनावरांच्या मलमूत्राशी थेट संपर्क टाळावा. भात शेतीच्या हंगामात काम करणाऱ्या व्यक्तींनी अंगावर जखम असल्यास जखमेला बॅन्डेज करावे. पाळीव प्राणी, मांजर, कुत्रा यांच्याशी जवळीकता टाळावी व पाळीव प्राण्यांचे नियमित लसीकरण करुन घ्यावे.. साथरोगाची लक्षणे आढळून आल्यास जवळील आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा, असे प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.